पुणे : महान्यूज लाईव्ह
गौतमी पाटीलच्या बैलासमोरील डान्सचा आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांचा काय संबंध? परंतु पुण्यातील एका महाभाग पत्रकाराने थेट अजितदादांनाच प्रश्न विचारला की, गौतमी पाटील ही बावऱ्या नावाच्या बैलांसमोर नाचली, तुमचे काय म्हणणे आहे? मग अजित पवारांनी देखील अजितदादा स्टाईल उत्तर दिले.. ती बैलांसमोर नाचेल, नाहीतर कोणासमोरही नाचेल; तुला त्याचा काय त्रास?
मुळशीतील सुशील हगवणे युवा मंचने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटील चक्क बैलांसमोर नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हळदीच्या कार्यक्रमात आयोजित या नाचकामावेळी पुढे गोठ्यात बैल बांधला असल्याने त्याची चर्चा अधिक झाल्याचे कोणी सांगितले, तर दुसरीकडे मुळशीतील हा प्रसिद्ध बावऱ्या बैल असल्याने बैलासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला होता अशी देखील चर्चा या निमित्ताने रंगली.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी बारामतीतील एका मेळाव्याच्या कार्यक्रमात बोलताना एका कार्यकर्त्यांने मतदानाच्या निमित्ताने यात्रेचा विषय काढला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, आधी मतदान मग यात्रा.. अन् बोलण्याच्या ओघात त्यांनी.. त्या पाटील बाईंना बोलवा असे म्हटले.
त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले की, एखादा कार्यक्रम आयोजित करताना किंवा ते सादरीकरण करताना तो लोकांनाही आवडला पाहिजे. बाकीच्या बाबत आपल्याला काही म्हणायचे नाही. मध्यंतरी गौतमी पाटील या विषयावर आपण या संदर्भातच बोललो होतो असे दादा म्हणाले, पण पत्रकार भलतेच नांदेड! अजित पवार हे गौतमी पाटीलच्या प्रश्नावर नरमले अशी चर्चा पुढे पत्रकारांनी सुरू केली.
त्यात भरीस भर म्हणून पुण्यातील मुळशीत गौतमी चक्क बावऱ्या नावाच्या बैलासमोर थिरकताना दिसली. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमीने लावणी केली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. मग हे बातमीचे गुऱ्हाळ बंद होऊ नये म्हणून वृत्तवाहिन्याच्या सुपारीनुसार पत्रकाराने अजित पवारांना थेट गाठले आणि प्रश्न केला, तो म्हणजे, दादा.. गौतमी पाटील बावऱ्या नावाच्या बैलासमोर नाचली..!
राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला काय प्रश्न विचारावे याची जर अक्कल बातमीदाराला नसेल, तर उत्तर ठसकेबाज आले म्हणून थयथयाट कशाला? या प्रश्नावर अजित पवारांनी ठसकेबाज उत्तर दिले आणि साहजिकच राजकीय नेत्याला वेगळाच प्रश्न विचारला, तोही हास्यास्पद ठरला; म्हणून तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला..!
एखादा नेता काहीतरी बोलला, मग याच्यावर आपण उत्तर द्यावे.. असे अजित पवारांना वाटत नसल्याचे अनेकदा पत्रकार परिषदांमधून दिसते. अजित पवार अनेकदा यावर नापसंती व्यक्त करतात. कोण काय बोलते याविषयी मला सांगू नका, असे ते अनेकदा बोलतात. गेली अनेक वर्ष त्यांचे म्हणणे हेच असतं. पण लोकांच्या मुलभूत व गंभीर प्रश्नापेक्षा चॅनल टीआरपीकडे सर्वाधिक भर असलेल्या पत्रकारितेचा नंगानाच मात्र अलीकडच्या चार-पाच वर्षात जास्त झाला. त्यातूनच राजकीय नेत्यांना फालतू प्रश्न विचारण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. गौतमी पाटील हा विषय त्यापैकीच एक..!