बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरात घुसून चोरट्यांनी हात पाय बांधून 55 लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने आणि ऐवज मिळवून 63 लाख 15 हजार रुपयांची चोरी केली आहे.
याप्रकरणी देवकाते नगर देवकाते पार्क येथील तृप्ती सागर गोफणे यांनी बारामती तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या साडेआठ वाजण्याच्या सुमारास तृप्ती गोफणे यांच्या घरात तीन अज्ञात चोरटे अनोळखी चोरटे घुसले व त्यावेळी गोफणे ह्या एकट्याच घरी होत्या चोरट्यांनी गोफणे यांचे हात पाय बांधून घरातील ऐवज चोरून नेला.
यामध्ये जमीन खरेदीसाठी घरात आणून ठेवलेली तब्बल 55 लाख तीस हजार रुपयांची रोख रक्कम, सहा लाख रुपयांची सोन्याची चेन, नव्वद हजार रुपयांचे मिनी गंठण, अठरा हजार रुपयाची सोन्याची चेन, १२ हजार रुपयांचे कानातील दागिने, अठरा हजार रुपयांची अंगठी, आठ हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, 25 हजार रुपयांचा ऍप्पल कंपनीचा मोबाईल एवढा सारा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी गोफणे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. बारामती शहराच्या परिसरात रात्रीच्या फक्त सव्वा आठ वाजता अशा प्रकारची धाडसी चोरी झाल्याने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.