दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
तसंही वाई तालुका म्हटलं की, पाऊस जास्त पडतोच! पण अवकाळीनं या वाई तालुक्याच्या चिखली गावावर एवढा मोठा संकट आणले की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे बघवत नव्हतं. आज रविवारच्या दिवशी वाई तालुक्यातील चिखली गावाला अवकाळीनं जोरदार तडाखा दिला. नुसती गारपीट झाली नाही, तर जमिनी देखील वाहून नेल्या. एवढं मोठं संकट या गावावर कोसळलं.
वाईच्या पश्चिम भागातील चिखली गावात झालेल्या ढगफुटीमुळे अंदाजे ५० एकर क्षेत्र वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाईच्या पश्चिम भागातील वाई ते जोर रस्त्यावर चिखली गाव आहे. येथे आज अचानक आभाळ भरून आले आणि थेट गारा पडू लागल्या. जणू ढगफुटीच असावी असा वेगवान वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे काही वेळातच येथील 50 एकरापेक्षा अधिक क्षेत्रावरील जमिनी आणि त्यातील पिके अक्षरशः वाहून गेली.
अनेक ठिकाणी मोठमोठी रस्त्यावरील झाडे कोसळून पडली. काही ठिकाणी रस्तेही वाहुन गेले आहेत. चिखली गावचे रहिवासी निलेश बाजीराव वाडकर यांच्या राहत्या घरावरील पत्रे ऊडून गेल्याने गहू, तांदूळ, ज्वारी असे मिळून ११ पोती धान्य पाण्याखाली गेले व घरातील कपडे व सर्व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.
वाई तालुक्याच्या सर्व दूर भागात आज दुसऱ्या दिवशी देखील वेगवान वारे वाहत होते आणि विजांचा लखलखट आणि ढगांचा गडगडाट यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या गावातील जुन्या पिढीतील ग्रामस्थांनी सांगितले की, या ठिकाणी पावसाळ्याच्या काळात कितीतरी मोठे मोठे पाऊस आम्ही पाहिले, परंतु अवकाळीचा असा पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.