विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते नागपूरमध्ये दाखल होत आहेत.अजित पवारही नुकतेच नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मला एक कळत नाही की, माझ्यावर सगळ्यांचं प्रेम एवढं का ऊतू चाललंय? मी दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले. उदय सामंत बोलले. दादाजी भुसे बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचं एवढं प्रेम का उतू चाललंय ते कळायला मार्ग नाही.
मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही करणार? बसणार तर कुठे बसणार?अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती”,असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, आता अपक्ष धरुन भाजपकडे 115 आमदार आहेत. 40 आमदार आणि 115 मिळून 155 झाले. आणि इतर 10 आहेत. म्हणजे 165! त्यामुळे 16 कमी झाले, तरी आकडा 149 राहतो. बहुमताचा आकडा 145 आहे. 16 आमदार अपात्र झाले, तरी त्यांच्याकडे 145 आमदार राहतील, ही वस्तुस्थिती आहे. कारण नसताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. असेही अजित पवार म्हणाले आहेत.