सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे गुरुवारी (दि.१३)रात्री वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी या भागात दोन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बावड्यात तीन ठिकाणी वीज कोसळली माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शेतात देखील वीज कोसळल्याची घटना घडली आहे.
निमगाव केतकी येथील पाटीलवस्ती येथे वीज कोसळून एका शेतकर्याची दुभती गाय जागीच ठार झाली. तर शेंडेमळा येथे झाडावर वीज कोसळली, मात्र यात कुठलीही हानी झाली नाही. येथील मदन कांतीलाल पाटील यांच्या दुभत्या गायीच्या अंगावर वीज कोसळून दुभती गाय जागीच ठार झाली. मदन पाटील यांनी एक लाख पन्नास हजाराची गाय खरेदी केली होती. सकाळी व सायंकाळी मिळून २०लिटर दूध देणारी गाय ठार झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती काकडे व पशु पर्यवेक्षक अधिकारी डॉ.अशोक काळे यांनी मृत गायचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठवला.
इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकर्यांच्या जनावरांसाठी चारा पिकांचे तसेच तरकारी, भाजीपाला व फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. जांभूळ, द्राक्ष, आंब्यांच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निमगाव केतकी येथील अशोक घाडगे यांच्या आंब्याच्या बागेमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला असून या अवकाळी पावसाने केशर जातीचा तीन ते चार टन आंबा खराब झाला.