दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : लाखो भाविकांच्या नवसाला पावणारी वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे ग्रामदैवत आणी हेमाडपंथी मंदिरात विराजमान असलेल्या आई पद्मावती देवीची वार्षिक यात्रा उत्साहात पार पडली.
हे मंदिर येथील ग्रामस्थांचे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. या पद्मावती देवीचा वार्षीक यात्रेचा रविवार दि .९ हा मुख्य दिवस होता. देवस्थान हे जागृत असल्याची श्रध्दा असल्याने मंदिरातील दरबारात दिवसभर नवस करण्यासाठी व इच्छापुर्तीचा नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, तरुण, तरुणी, आबालवृद्ध भाविकांची गर्दी होती.
रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पद्मावती चौकात भाविकांनी गर्दी केली होती. धार्मिक प्रथेप्रमाणे महिला एकमेकींना हळदी कुंकु देताना व घेतानाचा उत्साह होता. ग्रामस्थ व परिसरातील भाविक हे आईच्या चरणी आपली सुःख दुःखे मांडून गुलाल चरणी अर्पण करत होते.
रात्री ९ वाजता छबीना गाव प्रदक्षिणेसाठी आईची चांदीची पालखी विविध रंगाच्या फुलांच्या हारांनी सजवण्यात आली होती. तर आईच्या छबीना पालखीचे स्वागत करण्यासाठी पद्मावती चौकात भाविकांनी गर्दी केली होती. या चौकात पारंपारिक वाद्य, ढोल, लेझीम आणि झांजेच्या तालावर येथील तरुणाई न थकता नाचण्यात दंग झाल्याचे चित्र दिसत होते.
यात्रा कमिटीच्या वतीने छबिन्याची शोभा वाढवण्यासाठी कणूर, बावधन व व्याजवाडी येथून नामांकित ढोल पथके मागवून छबिन्याची शोभा वाढवली होती. आज सायंकाळी कुस्ती शोकिनांसाठी कुस्त्यांचा फड भरविण्यात आला होता. यात सातारा जिल्ह्यातील अनेक नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता.