दौंड: महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कसबे पाटस ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंचपदी रंजना संदीप पोळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम गायकवाड यांनी दिली.
दौंड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. सरपंच अवंतिका अभिजित शितोळे यांनी काही दिवसांपूर्वी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त पदावर सोमवारी (दि.१०) ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सरपंच पदासाठी सौ. रंजना संदीप पोळेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. गायकवाड यांनी जाहीर केले. पाटसचे मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. गायकवाड, गाव कामगार तलाठी संतोष येडुळे, ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे यांनी या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले.
दरम्यान, पाटस ग्रामपंचायतीच्या १७ जागांवर माजी आमदार रमेश थोरात गटाचे १० सदस्य तर आमदार राहुल कुल गटाचे ५ व अपक्ष २ विजयी झाले होते. अपक्ष दोन सदस्यांनी माजी आमदार थोरात गटाला पाठींबा दिला. सध्या पाटस ग्रामपंचायतीवर माजी आमदार थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल गटाच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
परिणामी उपसरपंचपदी माजी आमदार थोरात गटाचे राजवर्धन शितोळे यांची बिनविरोध निवड झाली. तर या सरपंचपदाच्या निवडणुकीतही आमदार कूल गटाच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने माजी आमदार थोरात गटाच्या रंजना पोळेकर यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही निवडणुकीत आमदार कुल गटाच्या सदस्यांनी माघार घेतली. दोन्ही निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने हा पाटस परिसरात राजकीय क्षेत्रात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.