वडापूरी – काटी रस्त्यावर कारवाई… इंदापूर च्या एकावर गुन्हा दाखल..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : कत्तल करण्यासाठी चालवलेल्या 39 लहान वासरांचा पिकअप टेम्पो इंदापूर पोलिसांनी पकडला.ही कारवाई वडापूरी – काटी रस्त्यावर शनिवारी (दि.8) साडेपाच वाजता करण्यात आली. या कारवाईमुळे पोलिस कारवाईला न जुमानता इंदापूर तालुक्यातील रस्त्याने कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
याप्रकरणी समिर रफिक बेपारी (वय 25 वर्षे रा. इंदापुर कसाबगल्ली ता. इंदापुर जि. पुणे ) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 39 जर्सी गायची वासरे प्रत्येकी हजार रुपये प्रमाणे 39 हजार रुपयांची वासरे ताब्यात घेण्यात आली आहेत.
याप्रकरणी सलमान खान यांनी फिर्याद दिली आहे. खान हे आपल्या सरकारी वाहनातून इंदापूर – अकलूज रोडवर पेट्रोलिंग करत असताना वडापुरी – काटी रोडवर (ता. इंदापुर जि. पुणे) येथे समिर रफिक बेपारी ( कसाबगल्ली इंदापूर, ता. इंदापुर जि.पुणे) याने त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाचा महिंद्रा पिकअप टेम्पो (नं. MH-42M8965) च्या हौद्यामध्ये 39 जर्सी गायीची वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने दाटीवाटीने कोंबुन घेऊन जाताना मिळून आला.
इंदापूर पोलिसांनी आरोपीवर प्राणी क्रता अधिनियम 1960 कलम 11(1) ग ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. पकडण्यात आलेली वासरे ही श्रीनाथ गोशाळा मेडद (ता. माळशिरस जि. सोलापूर) येथे जमा करण्यात आल्याचे समजते. पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने करत आहेत.