बारामती – महान्यूज लाईव्ह
काल बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायालयानजिक पोलिसांनी सापळा रचला होता.. बारामतीतील पोलिसांनी साडेनऊ लाखांची खंडणी एका कुटुंबाकडून एक ठग वसूल करू पाहत होता.. त्याच्यासाठी हा सापळा होता. यामध्ये प्रशांत शिवाजी थोरात (रा. सूर्यनगरी, बारामती) या ठगाला जिल्हा व सत्र न्यायालयानजिक पोलिसांनी पकडले आणि त्याने केलेले कांड समोर आले.
मार्केड यार्डनजिकच्या विठ्ठलनगर हौसिंग सोसायटीतील अक्षय अशोक रणसिंग यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी हा सापळा रचला होता. त्यानंतर वकील व पोलिस एअधिकाऱ्यांच्या नावाखाली थोरात हा रणसिंग कुटुंबाला लुटत होता हे समोर आले.
महाविद्यालयीन युवक असलेल्या नातेवाईक मुलास पोलिसांनी लूटमारीच्या प्रकरणात डिसेंबर महिन्यात अटक केली होती. त्याचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला होता. मात्र याचा जामीन करायचा का? अशी विचारणा थोरात या कुटुंबाला सातत्याने करीत होता.
त्यानंतर अचानकच थोरात याने रणसिंग कुटुंब दाद देत नसल्याने ज्या मुलाविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती, त्याच्या वडीलांना गाठले व थोरात याने तुमच्या मुलाविरोधात पोलिस मोक्काची कारवाई करणार आहेत असे सांगितले. मात्र माझी पोलिसा्ंशी ओळख असून मोक्काची कारवाई टाळायची असेल, तर एक लाख रुपये द्या असे सांगितले.
त्यावरून त्या कुटुंबाने एक लाख रुपये थोरात याला दिले. त्यानंतर उच्च न्यायालयात जामीनासाठी वकीलांना एक लाख रुपये असे आणखी एक लाख रुपये त्याने या कुटुंबाकडून घेतले. एवढ्यावर न थांबता पोलिसांनी चार्जशीट वेळेपूर्वी दाखल करण्यासाठी पोलिस एक लाख मागत आहेत व वकीलांनीही एक लाख रुपये मागितले असल्याचे सांगत ते पैसे घेतले.
त्यानंतरही थोरात याने मोक्का न लावण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचे सांगत त्यासाठी अडीच लाख रुपये मागितले. त्या कुटुंबाने दोन खोल्या विकून दीड लाख रुपये व उसने एक लाख रुपये असे अडीच लाख रुपये थोरात यास दिले.
त्यानंतर थोरात याने रणसिंग यांना केस माघारी घेत असल्याचे एक बनावट पत्र दाखवले. यामध्ये पोलिस ठाण्याचा, पोलिस अधिकाऱ्याचा शिक्का व सही असलेले एक बनावट पत्र दाखवले. पोलिसांना आता मॅनेज करण्यासाठी दीड लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितल्यानंतर त्यावर विश्वास बसल्याने तीही रक्कम दिली.
मात्र त्यानंतर तुम्ही तपास अधिकाऱ्यांना परस्पर का भेटता असे म्हणत आणखी ५० हजारांची मागणी केली. त्यामुळे रणसिंग यांनी तालुका पोलिस ठाण्यात दाद मागितली. त्यावेळी थोरात याने पैसे उकळल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यानंतर रणसिंग यांनी सर्व माहिती पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी सापळा रचून थोरात याला पकडण्याचे ठरवले. त्यानुसार ५० हजार देण्यासाठी थोरात याला बोलावले. दहा हजार रुपये व खेळण्यातील इतर नोटा असे ५० हजार रुपये भरलेली रक्कम पंचांसमक्ष घेताना थोरात याला पोलिसांनी पकडले. तोपर्यंत मात्र त्याने साडेनऊ लाख रुपये उकळले होते.