दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथील ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया तलावामधील पाणीसाठा आटल्याने सध्या हा तलाव म्हणजे माती आणि वाळू माफियांसाठी आश्रयस्थान बनला आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर जेसीबी, पोकलेन मशीन व हायवा वाहने उत्खनन करण्यासाठी उतरलेली दिसतात.
वरवंड येथे ब्रिटिशांनी वरवंडसह आसपासच्या गावातील शेतकऱ्यांचा व पिण्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी हा तलाव बांधला. या तलावला ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिने भेट दिल्याने या तलावाला व्हिक्टोरिया तलाव असे नाव पडले आहे. तेव्हापासून हा तलाव परिसरातील गावातील नागरीकांची तहान भागवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीला एक वरदान ठरला आहे.
मात्र मागील काही दिवसांपासून या तलावातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने हीच संधी साधून स्थानिक वाळू आणि रेती माफीयांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी माती नेण्याच्या नावाखाली जेसीबी व पोकलेन मशीन मोठ्या संख्येने या तलावात उतरुन उत्खनन करण्यासाठी उतरवली आहेत.
वरवंड व आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवरील शेतकऱ्यांना आपल्या शेतात माती टाकण्यासाठी या तलावातील गाळयुक्त माती अत्यंत गुणकारी व उपयुक्त आहे. त्यामुळे काही शेतकरी स्व:खर्चाने या तलावातील माती उपसा करून आपल्या शेतांमध्ये नेऊन टाकत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली स्थानिक माती व वाळू माफियांनी आपलं बस्तान तलावात उतरवले आहे.
त्यासाठी राजकीय नेते, पाटबंधारे विभाग व महसूल विभागाला हाताशी धरून लाखो रुपयांचा महसूल बुडवून हा व्यवसाय जोमात सुरू केला आहे. या तलावातील माती ते शेतकऱ्यांना विकत आहेत. तर या तलावात काही ठिकाणी वाळूचे साठे असल्याने ते मातीमिश्रीत वाळू हायवा वाहनाच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी नेऊन ती चाळून त्याचे ढीग साठवले आहेत.
शेतकऱ्यांना शेतीसाठी माती नेण्यात कोणाचेही दुमत नाही, उलट या तलावातील गाळ व मातीचा उपसा झाल्यास तलावाची खोली वाढणार असून पाणीसाठा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. मात्र या तलावाचा उपसा करताना महसूल विभाग व पाटबंधारे विभागाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही, तसेच नियंत्रण व देखरेखही नाही, या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना किती माती शेतीसाठी न्यायची आहे त्या शेतकऱ्यांने शेतजमीनाचा सातबारा उतारा महसूल विभाग व पाटबंधारे विभागाकडे नोंद केली आहे का ?
त्यासाठी तलावात खरंच शेतकरीच आपल्या शेतात शेतीसाठी माती येत आहे का? हे पाहण्यासाठी पाटबंधारे विभागाचा व महसूल विभागाचा एकही कर्मचारी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली माती आणि वाळू माफिया चांगलेच चरत आहेत. दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी या तलावाचा उपसा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे तसेच बेकायदा माती व वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केली आहे.