संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच अपघातांची मालिका..
हेमंत थोरात– महान्यूज लाईव्ह
साखर कारखान्यातील निवृत्त कामगाराची पेन्शन ती किती? फार तर दीड ते दोन हजार रुपये! ती घेण्यासाठी १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी सकाळी घर सोडलेल्या बाबुराव कोकरे यांना पुन्हा घरी परतण्यासाठी काळाने सवडच दिली नाही.. त्यांच्याबरोबर त्यांच्या मित्राचेही घर काळाने उजाड केले..!
इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर टाकळी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील बाबुराव रखमाजी कोकरे व संजय रखमाजी कुंभार (वय ४९ वर्षे) हे दोघे दुचाकीवरून चालले होते.
कोकरे हे पाटस येथील भिमा सहकारी साखर कारखान्यातून नुकतेच निवृत्त झाले असून त्यांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम बॅंकेतून काढण्यासाठी ते पाटसकडे निघाले होते. त्यांची दुचाकी शेळगाव येथून संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावरून निघाली असताना अचानक समोरून उलट्या दिशेने (एमएच १४ सीएम ०७०९) क्रेन आली. क्रेनचालकाने थेट समोर क्रेन आणल्याने कोकरे व कुंभार यांची दुचाकी क्रेनखाली चिरडली गेली.
त्यात कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कुंभार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी इंदापूर येथे नेण्यात आले, मात्र त्यांचाही मृत्यू झाला. इंदापूर तालुक्यातील परीटवाडी मोहन जगन्नाथ कोकरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून राजू शंकर मडके या क्रेनचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
थोड्याच अंतरावर अगोदरच एक अपघात.. एकाचा मृत्यू
दरम्यान सकाळी ९ वाजता एक अपघात झाला. या अपघातात भरणेवाडी येथील खऱाडेवस्ती येथे राहणाऱ्या मारुती शंकर धातुंडे (वय ५२ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते जंक्शन बाजूकडून कळस बाजूकडे सायकलवरून जात होते. तेव्हा खर्जूलवस्तीनजिक कळस बाजूकडून जंक्शन बाजूकडे येणाऱ्या टाटा कंपनीच्या इन्ट्रा मॉडेलच्या वाहनाने ठोस देऊन धातुंडे यांना जखमी केले. त्यात धातुंडे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भरणेवाडी येथील सुरेश गौतम भरणे यांनी वालचंदनगर पोलिसांकडे फिर्याद दिली असून वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार खाडे पुढील तपास करीत आहेत.