निरा : महान्यूज लाईव्ह
आचार्य अॅकॅडमी बारामती द्वारे नीरा येथे नुकतीच १०वी ची बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व पालकांकरिता गुरुमंत्र यशाचा या शैक्षणिक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आचार्य अकॅडमीचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकुळे सर उपस्थित होते. यावेळी चर्चासत्रादरम्यान ज्ञानेश्वर सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यानंतर पिंपरे खुर्दच्या समर्थ कुसेकरला अचानक लॉटरीच लागली. त्याच्या अकरावी, बारावी या दोन शैक्षणिक वर्षांसह त्याच्या जेईई परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च संपुर्णपणे बारामतीच्या आचार्य अॅकॅडमीने उचलला. हा प्रसंग म्हणजे माझ्यासाठी जणू एक पर्वणीच होता असे मत यावेळी समर्थच्या वडिलांनी व्यक्त केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढे काय करावे हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता परंतु ज्ञानेश्वर सरांनी माझ्या मुलाची आचार्य ज्ञानदान योजनेअंतर्गत निवड केल्याने हा यक्ष प्रश्न क्षणार्धात सुटला याबद्दल आचार अकॅडमीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी हसत खेळत मार्गदर्शन करताना मुटकुळे सरांनी यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: प्रेरीत होण्याची गरज सांगितली. दुसरे कुणी सांगून काही होणार नाही, तर विद्यार्थ्यांनी स्वत: परिश्रम घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून दूर जाते, यासाठी मोबाईलपासून लांब राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या स्वभावाला योग्य असे करियरचे क्षेत्र निवडावे तसेच १५ वर्षानंतर ज्या क्षेत्राला मागणी असेल असे आपल्याला वाटते अशा क्षेत्रात जाण्याचाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी बोलताना आचार्य अॅकॅडमीचे शैक्षणिक समन्वयक प्रा. बापू काटकर यांनी एसएससीमध्ये उत्तम गुण मिळविलेला विद्यार्थी जेईई आणि नीटसारख्या परिक्षांमध्ये तेवढे गुण मिळवू शकत नाही असे सांगितले. याचे कारण केवळ पाठांतराच्या आधारे एसएससीत गुण मिळू शकतात परंतू जेईई, नीटसारख्या परीक्षांमध्ये संकल्पना समजावून घेणे जास्त महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी जेईई, नीटसारख्या प्रवेश परिक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांना माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये आचार्य अकॅडमीचे संचालक प्रा. सुमित शिनगारे, प्रा. प्रवीण ढवळे व श्री. कमलाकर टेकवडे यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले. पालक प्रतिनिधी शिवाजी काकडे आणि राजेंद्र बरकडे यांनीही यावेळी पालकांच्या अपेक्षा मांडल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन घनश्याम केळकर यांनी केले.