सचिन पवार : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुप्यात आज थरारक घटना घडली. संध्याकाळच्या पाच वाजताच्या सुमारास परप्रांतीय दरोडेखोरांनी बसस्थानका शेजारील एक सराफी दुकान लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी त्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. यानंतर मात्र चिडलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत या दरडोखोरांवरच झडप घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये इतर पाच जण पळून गेले, मात्र एक दरोडेखोर ग्रामस्थांच्या आणि पोलिसांच्या तावडीत सापडला.
सुप्यात आज संध्याकाळी हा थरार घडल्यानंतर बारामती तालुक्यात खळबळ उडाली. सुप्यात आज संध्याकाळी अचानक एक सराफी दुकान लुटण्याच्या उद्देशाने पाच ते सहा दरोडेखोर एकत्र आले. त्यांनी या दुकानात लूट देखील केली असून त्यांच्या इतर साथीदारांनी यातील सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान हे सर्व दरोडेखोर परप्रांतीय असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून, यातील दरोडेखोरांनी गोळीबार करून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
या गोळीबारात स्थानिक अण्णा चांदगुडे व अशोक बोरकर या दोघांना गोळी लागली. यामध्ये अण्णा चांदगुडे हे जखमी झाले. त्यांना तेथील स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यानंतर चिडलेल्या जमावाने दरोडेखोरांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक जण पोलिस व ग्रामस्थांच्या तावडीत सापडला. या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून इतर त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.