बारामती – महान्यूज लाईव्ह
आईबापांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. प्रचंड कष्ट केले. मात्र पोरांची आबाळ होऊ दिली नाही. पोरांना चांगलं शिक्षण दिलं.. त्यांना हिकमतीने संकटांना सामोरे जाण्याचे, त्यावर मात करण्याचे धडे दिले..पायावर उभं केलं.. त्या सहा पोरांनी कृतज्ञता म्हणून कालपरवा आईवडीलांच्या लग्नाचा ७० वा वाढदिवस साजरा केला..!
सोनगाव येथील बबन दगडू थोरात व द्रौपदा बबन थोरात यांच्या 70 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. विजय सरतापे यांनी खास आईवडीलांच्या कष्टाचं जीणं सांगणारी गीते सादर करून उपस्थितांना भावूक केले.
वडील दुसऱ्यांकडे मजूरी करायचे. प्रसंगी ओढ्याच्या, चारीची कामे केली. उसाची खांदणीबांधणी केली. दगडाच्या खाणीत काम केले. ४२ वर्षापूर्वी पोटाची शस्त्रक्रिया झाली. अगदी जीवावर बेतणाऱ्या कामातूनही त्यांनी कुटुंबाला सावरले. त्यांनी केलेल्या कष्टामुळे आज कुटुंब सावरले, रुळावर आले. प्रगती केली. त्यांच्या लग्नास ७० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने बाळासाहेब, गौतम, राहुल यांच्यासह मुली मंगल, लता व चांगुना यांनी एकत्र येऊन आपल्या आई-वडिलांचा हा कृतज्ञता सोहळा आनंदात साजरा केला.
भीमराव थोरात यांनी बबन आणि द्रौपदा यांच्या कष्टमय जीवनाची व दुःखमय क्षणाची आठवण उपस्थितांना करून देत मुलांचे कौतुक केले. शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे प्राचार्य सूर्यकांत मुंडे यांनीही या आनंदाच्या क्षणाची सर जगात कोठे नसल्याचे मत व्यक्त करीत मुलांचे कौतुक केले.