घनश्याम केळकर – बारामती
महान्यूज लाईव्ह विशेष
तो आणि ती.. तिच नाव राणी.. त्याला काही नावच नाही..दोघेही जन्मले कुत्र्याच्या जातीत..! माझी या दोघांशी गाठ पडली ज्यावेळी मी लाॅकडाऊन पडल्यामुळे एका आश्रमाच्या आश्रयाला गेलो त्यावेळेस.
सुरुवातीला त्यांनी माझं स्वागत जोरजोरात भुंकुनच केलं. पण नंतरच्या काही दिवसात त्यांनी मला स्विकारलं. जवळच्या तलावाकडे फिरायला जाताना ही जोडगोळी बरोबर असायची.
मला वाटत हळूहळू आम्ही एकमेकांना चांगले ओळखायला लागलो. दुपारी किंवा रात्री खायला दिलेली पोळी राणी कधीच वेळेत खात नसे. दहावेळा तिला बोलावल्यावरही ती आपल्याकडे पहात जागेवर बसून राही. तो मात्र न बोलावताही धावत येई. अगोदर राणीसाठी टाकलेल्या पोळ्या खाई. नंतर त्याच्यासाठी टाकलेल्याही खाई. काही वेळेस पोळ्यांचे तुकडे तोंडात पकडून लांब घेऊन जाई.
मात्र माणसांच्या अन्नावर त्यांचे विशेष प्रेम नव्हते. आजुबाजुला जंगल होत, तिथे ते आपले अन्न शोधत दिवसभर भटकत राहत. एकदा आश्रमाच्या आवारात आलेला मोराची दोघांनी झडप घालून केलेली शिकार पाहून आम्ही थक्कच झालो. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी मी खुर्चीत निवांत बसलेलो दिसलो की, राणी जवळ येऊन आपले अंग माझ्या पायांना घासत राही. थोडंसं थोपटल्यावर काही वेळाने तिला ओरडून हाकलावे लागे. तो मात्र लांबूनच पहात असे.
दोन आठवडे तिथे थांबल्यावर मी त्याच गावात दुसरीकडे राहायला गेलो. आठ दहा दिवसांनंतर मी आश्रमात गेलो. त्याने मला पाहिले आणि धावत माझ्याकडे आला. मला वाटले बरेच दिवसानंतर मी आल्यामुळे तो माझ्याकडे धावला असावा. त्याने माझ्या पायाला आपले अंग घासले आणि तोंडाने वेगळाच आवाज काढायला लागला.
जणू काही तो मला काही सांगू पहात होता. आणि जे सांगायचे होते ते फारसे आनंदाचे नव्हते. तोपर्यंत माझे आश्रमातील मित्र आले आणि आम्ही तलावाकडे फिरायला निघालो. तोदेखील आमच्याबरोबर निघाला. राणी कुठेच दिसत नव्हती. मी माझ्या मित्रांना विचारले, ” राणी कुठेच दिसत नाही.” त्यांनी सांगितले, ” तिने सध्या नविन मित्र गाठले आहेत. ती त्यांच्याबरोबरच असते. “
आता मला त्याचे मघाचे वागणे आठवले. त्याची मैत्रीण सोडून गेल्याचे दु:ख तो सांगत होता. तलावाच्या वाटेवरच राणी आणि तिच्या नव्या मित्रांचे टोळके आम्हाला दिसले. राणीने आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तो मात्र जोराने त्या टोळक्यावर धावला. थोडावेळ दोन्ही बाजुने गुरगुराट झाला. पुन्हा तो आमच्या बरोबर पुढे चालायला लागला.
त्यानंतर मी अनेकदा आश्रमाकडे आणि तलावाकडे गेलो. बहुतेक वेळा तो आमच्याबरोबर असे. पण त्याची नजर मात्र काहीतरी शोधत असे. कधीतरी राणी दिसे, ती तिच्या मित्रांसोबत असे. तो थोडीशी गुरगुर करत पहात राही. एका प्रसंगी मात्र राणी तिच्या मित्रांना मागे ठेऊन थोडी पुढे आली. तोदेखील तिच्या जवळ गेला. एकामेकांना हुंगत, तोंडाने वेगवेगळे आवाज काढत त्यांच्यात संवाद सुरु झाला. मी मनात म्हणले ” काहीतरी समझोता होतोय बहुतेक”
काही जरी झाल तरी आपल्यातील मैत्री कायम आहे असेच राणी त्याला सांगतीय अस मला वाटायला लागलं. तेवढ्यात माझ्या मित्राने मला हाक मारली आणि मी त्यांच्याबरोबर पुढे चालु लागलो. परत जेव्हा मी आश्रमाकडे गेलो त्यावेळेस मला लक्षात आले की, समझोता झालेला नाही. तो एकटाच आहे. आणि राणी तिच्या मित्रांसोबत फिरते आहे. त्याच्या डोळ्यामधून आणि देहबोलीतून दु:ख आणि निराशा स्पष्ट जाणवत होती.
आणि आता कालचीच गोष्ट. मी आश्रमात गेलो आणि व्हरांड्यात बसलो होतो. आणखीही काही लोक माझ्यासोबत होते. अचानक चार पाच कुत्र्यांच टोळक आश्रमाच्या समोरच निवांत येऊन बसले. राणी अर्थातच त्या टोळक्यात होती. आतापर्यंत माझं त्याच्याकडे लक्ष नव्हते, पण आता माझी नजर त्याला शोधू लागली. तो आमच्यापासून जवळच एका कोपऱ्यात पडला होता. त्याने एकवार मान वर करुन त्यांच्याकडे पाहिले आणि मग तसाच पडुन राहिला. त्याने लढाई सोडून दिली होती? का वस्तुस्थिती मान्य केली होती?
गोष्ट इथे खरतर संपली पाहिजे, पण संपत नाही. प्राण्यांमध्ये प्रणयाचा विशिष्ठ कालावधी असतो. तो संपल्यावर कदाचित राणी परत येईलही. आणी ते दोघेजण पुन्हा एकत्र भटकायला लागतीलही. कुणास ठाऊक? या दुखा:तही मला एका गोष्टीने दिलासा दिला.
तो माणूस नाही. नाहीतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले असते, किंवा पोटात चाकू खुपसला असता. किंवा आत्महत्या केली असती. थॅंक गाॅड, तो माणूस नाहीये.
( आपल्या लेखावरील प्रतिक्रिया ९८८१०९८१३८ या व्हाटसएप नंबरवर नक्की कळवा )