शिरूर – महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुका आता आरोपी पळून जाण्यासाठी प्रसिध्द होतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे, कारण दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे, ज्यामध्ये शिरूर पोलिस स्टेशनच्या आवारात आरोपीने पोलिसाच्या हाताला हिसक देत बेडीसह धूम ठोकली.
धनराज मधुकर डोंगरे (वय.२८, रा.मलठण फाटा, मूळ रा. चारदरी, ता. धारूर, जि. बीड) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच पळून गेल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी डोंगरे याच्यावर शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या सरकारी वाहनातून शिरूर पोलिस स्टेशन कोठडीत ठेवण्यासाठी आरोपीला आणण्यात आले होते.
आरोपी पोलिस स्टेशन हद्दीत आला असताना सरकारी वाहनातून उतरत असताना पोलिस अंमलदार उद्धव भालेराव यांच्या हाताला हिसका मारून शासकीय बेडी सह पळून गेला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.
आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.
शिरूर पोलिस स्टेशन येथे कोठडीत असताना आरोपीने कौले उचकटून काही महिन्यांपूर्वी पलायन केले होते.त्यानंतर पोलिसांनी आरोपीस शोधून गजाआड केले होते.पुन्हा आरोपी पलायन करण्याची ही दुसरी घटना घडली आहे.