जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांचा विश्वास!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : राज्य सरकारने नुकतेच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. या महामंडळामुळे गेली अनेक वर्षापासून वंचित व उपेक्षित असलेला रामोशी बेरड समाज हा मुख्य प्रवाहात येईल, त्याचबरोबर समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीकडे वाटचाल होईल. असा विश्वास जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व रामोशी समाजाचे नेते दौलत शितोळे यांनी व्यक्त केला.
जय मल्हार क्रांती संघटनेचा राज्यभरातील जनजागृती दौऱ्यास शनिवारी दौंडपासून सुरवात करण्यात आली. यावेळी शितोळे बोलत होते. ते म्हणाले, १३ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली.
त्यामुळे खऱ्या अर्थाने संघटनेच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीला न्याय मिळाला आहे. या आर्थिक विकास महामंडळामुळे राज्यातील ७० लाख लोकसंख्येच्या आसपास असलेल्या वंचित उपेक्षित भटक्या विमुक्त जातीतील रामोशी – बेरड समाजाला लाभ मिळणार आहे. समाजातील बेरोजगार तरुण, शालेय विद्यार्थी व गृहिणी व होतकरू महिलांना रोजगार उपलब्ध होईल, त्यांना आर्थिक मदत होईल परिणामी ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील तसेच त्यांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती होण्यासाठी मोठी मदत होईल.
राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाल्यानंतर याची समाजात जनजागृती व्हावी त्याचे महत्व तळागाळातील समाज बांधवांना पटवून देण्याच्या उद्देशाने राज्यभर दौरा सुरू केला आहे, संघटनेच्या गाव तिथे शाखा सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे. तसेच समाजातील शालेय विद्यार्थ्यांना व गरजू जातीच्या दाखल्यांची समस्या जाणवत आहे, त्यासाठी तालुका पातळीवर ठीक ठिकाणी एका ठिकाणी जातीचे दाखले मिळण्यासंदर्भात मेळावा घेण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी शितोळे यांनी दिली.
राजे उमाजी नाईक या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रामोशी समाजाकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. अर्थात राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची लवकर स्थापना करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी ही दौलत शितोळे यांनी यावेळी केली.
याप्रसंगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बापुराव खोमणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मंडले, दौंड तालुका अध्यक्ष दादासाहेब खोमणे, संघटनेचे राजेंद्र माखर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.