दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील लोहारे गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. एका भामट्याने त्याच्या पोराला नोकरीला लावतो म्हणून गंडवले.. कर्ज घेतले, ते फिटले नाही.. अन उसाचे जुनं बील मिळाले नाही, कर्ज वाढत गेलं अशा विविध कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.
लोहारे गावात नारायण गणपत संकपाळ (वय ४८) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शेतीच प्रमुख व्यवसाय असलेल्या या शेतकऱ्याने सोसायटी, बॅंक आणि पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. मार्च महिन्यातील कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी केलेला पाठपुरावा व कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने गळफास घेतल्याची परिसरात चर्चा आहे.
स्थानिक नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार लोहारे ( ता. वाई) येथील नारायण संकपाळ यांनी गावातील सोसायटीतून पिककर्ज घेतले होते. दोन वर्षापूर्वी साखर कारखान्याला घातलेल्या उसाचे बिल अजून मिळाले नव्हते. शेतीच्या पाईपलाईनसाठी घेतलेले कर्ज त्यामुळे फिटत नव्हते.
त्यातच मुलाला सैन्यात लावण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने त्यांना एक लाखाचा गंडा घातला होता. या साऱ्या अडचणींमुळे त्यांच्यात नैराश्य आले आणि शुक्रवारी (ता. २३) त्यांनी वाडीचे रान नावाच्या शिवारात, सागाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वाई पोलिस ठाण्यात या बाबत ज्ञानेश्वर जयसिंग संकपाळ यांनी खबर दिली. या घटनेचाअधिक तपास वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी वायदंडे हे करीत आहेत.