दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील सटालेवाडी गावात येथील बंद घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले. थोडेथोडके नव्हे दोन लाखांचे दागिने चोरीला गेले. चोरीची तक्रार दिली. पण पोलिसांनी त्यांच्या कुशल नजरेने चोरटा न्याहाळला.. कारण चोरटा घरातीलच निघाला.. वंशाचा दिवटाच चोर निघाला.
फिर्यादीच्याच मुलाने आपल्या आईचे तब्बल दोन लाखांचे दागिने चोरल्याने याची चर्चा अधिक झाली. या प्रकरणी पोलिसांनी ओंकार दिपक जाधव (वय १९ वर्षे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ७५ हजारांचे दागिनेही जप्त केले. चोरी उघड झाली, मात्र साऱ्यांचीच पंचाईत झाली असा काहीसा प्रकार सटालेवाडीत घडला.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सटालेवाडी (ता. वाई) येथे १९ मार्च रोजी रात्री १० ते २१ मार्च २०२३ रोजीच्या सकाळी ८ वाजण्याच्या कालावधीत हा प्रकार घडला. विद्या दिपक जाधव यांच्या सासूबाई वाई येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल असल्याने विद्या या तिकडे असताना त्यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने चोरी केली आणि १ लाख ७५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरले. त्यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उप विभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व डिबी पथकाचे विजय शिर्के, हवालदार सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी या घटनेचा तपास सुरू केला.
दरम्यान भरणे यांना ही चोरी फिर्यादीच्याच घरातील व्यक्तीने केली असल्याची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केल्यानंतर वाई बसस्थानकासमोर ओंकार हा संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पळू लागला. त्यास सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडले.
तेव्हा त्याच्याकडे हे सोन्याचे दागिने आढळून आले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. १९ वर्षाच्या ओंकारवर यापूर्वीही चोरी केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.