दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायत च्या हद्दीत असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याने पाटस ग्रामपंचायत प्रशासनाचे तब्बल १ कोटी ३३ लाख १३ हजार ४६९ रुपये विविध कराची रक्कम थकवली आहे, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने भीमा पाटस कारखान्याच्या व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान कारखान्याच्या व्यवस्थापकांकडून थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती पाटस ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे यांनी दिली. भीमा सहकारी साखर कारखान्याने पाटस ग्रामपंचायतची विविध कराची थकबाकी मागील सहा- सात वर्षांपासून भरली नाही.
भीमा सहकारी साखर कारखाना हा पाटस ग्रामपंचायत हद्दीत असल्याने सन २०१५ पासूनची विविध करांची थकबाकी भरण्यासंदर्भात पाटस ग्रामपंचायतीने कारखाना स्थळावर जाऊन व पोस्टामार्फत नोटीस बजावली होती. मात्र ही नोटीस कारखाना प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे ही नोटीस कारखाना कार्यस्थळावर चिकटवण्यात आली.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम क्रमांक १२९ (१) नुसार ही नोटीस बजावण्यात आली असून पंधरा दिवसाच्या आत थकबाकी बाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने या नोटीसद्वारे दिला आहे. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे यांनी दिली.
दुसरीकडे पाटस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या श्री सिमेंट कंपनीलाही अशाच प्रकारची नोटीस बजावली असून सिमेंट कंपनीकडे १ कोटी २८ लाख २६ हजार ८४४ विविध कराची थकबाकी आहे. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी लांडगे यांनी दिली.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांकडून घरपट्टी व विविध कर भरल्याशिवाय कोणतीही शासकीय कागदपत्रे व दाखले दिले जात नाहीत, मात्र दुसरीकडे या कंपन्यांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी असूनही त्यांना मात्र अभय दिले जात आहे. असा दुजाभाव का ? ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करीत नाहीत ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.