राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : मी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी कारखान्याचा सभासद आहे, माझे वडील व माझे कुटुंब ही या कारखान्याचे सभासद आहेत. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्यावर कोट्यावधीचे कर्ज करून भ्रष्टाचार आणि घोटाळा करुन संचालक मंडळाने डल्ला मारला आहे. या प्रकरणाची पोलखोल ही होणारच असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पुण्याचे कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष आणि दौंड चे आमदार राहुल कुल यांच्यावर केली. भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी कारखान्यात ५०० कोटींच्या कथित भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. खासदार संजय राऊत आणि आमदार कुल समर्थक यांच्यात राजकीय वातावरण तापले असतानाच आता यामध्ये पुणे कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी उडी घेतली आहे.
आमदार धंगेकर हे दौंड तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी भीमा पाटसच्या कारभाराचा समाचार घेत कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्यावर टीका केली. आमदार धंगेकर म्हणाले की, खासदार संजय राऊत यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात पाचशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत. खासदार राऊत यांच्याकडे याबाबत कागदपत्रे पुरावे आहेत. पुरावे असल्याशिवाय ते याबाबत बोलणार नाहीत.
कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी कारखान्यावर विविध बँकांचे कोट्यावधींचे कर्ज काढून तो कर्जबाजारी केला. त्यामुळेच कारखाना बंद होता, आता हा कारखाना कोणत्या तरी व्यक्तीला भाडेत्वावर खाजगीकरण करून चालवायला दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे, फक्त संजय राऊतच बोलत नाहीत, तर भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुक्यातील नेते त्यांनीही या भष्टाचाराबाबत तक्रारी केल्या आहेत आणि ते सातत्याने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या घोटाळ्यावर बोलतात.
आमदार कुल समर्थकांनी राऊत यांचा निषेध सुरू केला आहे, मात्र, खासदार संजय राऊत हे दौंड मध्ये येऊन आमदार राहुल कुल यांच्या या भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची लवकरच पोलखोल करणार आहेत. महाविकास आघाडीचा एक आमदार म्हणून मी ही या कार्यक्रमाला येणार आहे. अशी माहिती आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.