दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
सातारा – बेकायदेशीर व्यवहार बेकायदेशीरच असतात.. आणि कमी श्रमात मिळणारा पैसाही माणसांना बरबाद करतो.. पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात काल झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबार प्रकरणी संशयित म्हणून ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठाण्याचा माजी नगरसेवक व शिवसेनेचा माजी संपर्कप्रमुख मदन कदम याने हा गोळीबार केल्याचा संशय असून धरण परिसरातील नागरिकांनी मदन कदम याच्या घराला वेढा घातला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
श्रीरंग लक्ष्मण जाधव (वय ४७) सतीश बाळासाहेब सावंत ( वय ३५ वर्षे रा. कोरडेवाडी, सातारा) या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला. तर प्रकाश लक्ष्मण जाधव यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले ाहेत. त्यांच्यावर कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे.
पवनचक्कीच्या पैशाच्या व्यवहारामधून हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मृत व्यक्तीपैकी एकजण हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निकटचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पाटण तालुक्यात तणावाची स्थिती आहे.
मदन कदम हा मल्हारपेठ येथील रहिवासी व ठाण्याचा माजी नगरसेवक असून गुरेघर गावात त्याची शेती आहे. त्याच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी एका किरकोळ अपघातात गावातील गाडीच्या काचा फोडल्या. ही भांडणे मिटविण्यासाठी कदम याने या सर्वांना शेतात बोलवले होते. या ठिकाणी फायरिंग झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.