व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला निर्णयात बदल
बारामती : महान्यूज लाईव्ह
सोमवारपासून बारामती शहर आणि तालुक्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू होणार होता. मात्र व्यापाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेल्या मागणीनंतर आता सातच दिवसांसाठी जनता कर्फ्यू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या तरी सात दिवस कडकडीत बंद राहणार असून पुढे परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बारामती शहर आणि तालुक्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नागरिकांकडून होत असलेली मागणी लक्षात घेऊन बारामतीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आणि पंचायत समिती सभापती नीता बारवकर यांनी जाहीर केले होते. मात्र हा निर्णय घेताना व्यापारी वर्गाला विश्वासात घेतले नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
आज दुपारी प्रांताधिकारी कार्यालयात व्यापारी, पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पहिल्या टप्प्यात सातच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे सोमवारपासून पुढील सात दिवस बारामतीत कडकडीत बंद असणार आहे. केवळ वैद्यकीय सेवा आणि दूध पुरवठा या सेवा सुरू राहणार आहेत.
दरम्यान, सध्या सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती बघून पुढील निर्णय घेण्याचे आज झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले आहे. त्यामुळे बारामती शहरासह बाजार समितीतील व्यापाऱ्यांनीही या कर्फ्यू काळात बंद पाळून सहकारी करण्याचे आवाहन नरेंद्र गुजराथी व महावीर वडुजकर यांनी केले आहे.












Ketani log bahar ja raha hai baramati me kya nahi hoga bas coronavirus hoga logo ko