दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात गावोगावी लाखो रूपये खर्च करून पक्के रस्ते बनविले आहेत. काही रस्त्यांची कामे होऊन वर्षही उलटले नाही तोच या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे छोटेमोठे अपघात वाढले असून प्रवाशी, शेतकरी व नागरीक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हैराण झाले आहेत.
दौंड तालुक्यात रस्त्यांचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे.मागील अनेक वर्षापासून दौंड शहराला जोडणाऱ्या पाटस-दौंड या राज्यमार्गावर मोठे खड्डे पडले होते. मध्यतंरी संबधित ठेकेदारांनी खड्डे बुजवन तात्पुरती दुरूस्ती केली होती. मात्र त्या रस्त्यांची पुन्हा तीच परिस्थीती झाली आहे.
पाटस-बारामती रत्यावर रोटीच्या घाटासह वासुंदेपर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दौंड ते सिध्दटेक, राजेगाव ते दौंड, पाटस ते कानगाव, कानगाव ते मांडगवण, वरवंड ते हातवळण, चौफुला ते शिरूर, केडगाव ते नानगाव तसेच तालुक्यातील ग्रामिण भागातील रस्त्यांचीही खड्ड्यांमुळे अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे.
तालुक्यात सत्ताधारी व विरोधक हे कोट्यावधी रुपये रस्त्यांची विकास कामे केली असल्याचे दावे करीत आहे. मात्र कोट्यावधी रूपये खर्च करून केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याची बाब समोर आली आहे. या रस्त्यांच्या प्रश्नावर सध्या तरी सत्ताधारी व विरोधकांनी मौन पाळले असल्याचे चित्र आहे.










