बारामती – माजी सैनिकांसाठी असलेल्या शासकीय योजना, जमीनींची मागणी तसेच शासकीय नोकरींबाबत अनेकदा प्रक्रिया लांबते, यासंदर्भात शासनाने सकारात्मक पावले उचलून यातील दिरंगाई कमी करावी अशी मागणी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी बारामतीत केली.
येथील औद्योगिक वसाहतीत जय जवान आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने ‘वर्धापन दिना’निमित्त कार्यक्रम आयोजिक करण्यात आला. यावेळी राज्यातील वीर पत्नी, वीरमाता, वीरपिता, सीमेवरील युद्धात जखमी झालेले आजी -माजी सैनिक यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सैनिकांच्या पाल्याचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. राज्याचे वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी सैनिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नारायण अंकुशे, राज्य महिला अध्यक्षा पुष्पा मुंडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, निवृत्त लेफ्टनंट व्ही आर जाधव, डॉ लक्ष्मण आसबे, डॉ रमेश भोईटे, अभिनेते घनश्याम येडे, नगरसेवक किरण गुजर, कमल कोकरे, बिरजू मांढरे, किशोर मासाळ, सागर आटोळे आदींसह आजी-माजी सैनिक व त्यांचा परिवार उपस्थित होता.
या कार्यक्रमात तुंगार यांच्यासह नारायण अंकुशे, निवृत्त हवालदार विक्रम जगताप, सुजल जगदाळे, डॉ लक्ष्मण आसबे, व्ही.आर.जाधव, किरण गुजर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बारामतीच्या जय जवान आजीमाजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी नगरपरीषदेने या संघटनेसाठी सभागृह, कार्यालयाची जागा द्यावी अशी मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले. राहुल भोईटे यांनी आभार मानले.











