सणसर – येथील आझाद तरूण मंडळाने वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा पुस्तके देऊन सत्कार केला. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी सत्काराला हारतुऱ्यांवर खर्च न करता पुस्तके द्यावीत या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा सत्कार केला, दत्ता सावंत लिखीत ऊस ब्राझीलचा-भारताचा ही पुस्तके यावेळी भरणे यांना भेट देण्यात आली,
गेली 30 वर्षे आझाद तरूण मंडळ हे सामाजिक परिवर्तनशील उपक्रम राबवून विधायक कार्यक्रम आयोजित करते. सणसर येथे रविवारी (ता.3) भरणे यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम घेतला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर भरणे प्रथमच सणसर येथे आले होते. त्याकरीता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शिंदे, छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, पार्थ निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे, छत्रपती कारखान्याचे स्थापत्य अभियंता नंदकुमार चांदगुडे आदींनी ही पुस्तके भेट दिली.
या भेटीचे भरणे यांनी कौतुक करीत अशाच प्रकारचा सत्कार तरुणांनी करावा, तसेच वाढदिवसाच्या दिवशीही मित्रांना पुस्तकेच भेट देऊन अवांतर खर्च टाळावा असे मत व्यक्त केले.











