दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. पाटस येथील एका ८० वर्षीय महिलेचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे पाटसमधील कोरोना बळींची संख्या सहावर गेल्याची माहिती वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॅा.शिवराणी पांचाळ यांनी दिली.
पाटसमध्ये कोरोनाचे रूग्ण दिवेसंदिवस वाढत आहे. गावठाणासह वाड्यावस्त्यांसह कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. त्यामुळे पाटसकरांची झोप उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र नागरीकांचा हलगर्जीपणामुळे कोरोना आटोक्यात येण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या १ ते ८ सप्टेंबरदरम्यान व्यापारी व ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावातील व्यवहार बंद ठेवले आहेत. मात्र, पुणे-सोलापूर महामार्गावरील मोठे हॅाटेल खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, पाटसमध्ये कोरोना बाधीतांचा आकडा १२० वर गेला आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८५ जण अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तालु्क्यातील कोरोना उपचार केंद्र हाऊसफुल झाल्याने अनेक रूग्णांना घरीच उपचार करीत आहेत. तर काहीजण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.











