जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दौंडमधील कोरोना स्थितीचा आढावा
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय यंत्रणा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती खबरदारी व नियोजन करीत आहेत. याबाबत आज गुरूवारी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दौंड भेट दिली. यावेळी दौंड येथील नवीन प्रशाकीय इमारतीत सर्व शासकीय अधिकारांची बैठक घेवून कोरोना संदर्भाचा आढावा घेतला. कोरोनाबाबत हलगर्जीपणा व नियमांचे उल्लंघन करणारावर त्वरीत कायदेशीर कारवाई करा असा सुचना त्यांनी दिल्या आहेत.
मागील काही महिन्यापासून दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा पुर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. मात्र नागरीकांच्या हलगर्जीपणा व नियमांचे पालन न करणे आदी प्रकारामुळे तालुक्यात कोरोना आटोक्याबाहेर गेला आहे. याबाबत आज गुरूवारी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दौंडला भेट दिली.
दौंड शहरात जाण्यापुर्वी त्यांनी पाटस येथील नागेश्वर विद्यालयात नियोजित कोवीड केअर सेंटरची पाहणी केली. दौंड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत कोरोना संदर्भात सर्व शासकीय अधिकारांची आढाव बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकारी देशमुख यांनी शहर व तालुक्यातील कोवीड सेंटरमध्ये सध्या रूग्णाची तपासणी व उपचार याबाबत काय स्थिती आहे याबाबत माहिती जाणून घेतली. खासगी रूग्णालाये तसेच शासकीय कोवीड सेंटरमध्ये तातडीने उपचार मिळावेत याबाबत सुचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, समाजकल्याण सभापती सारीका पानसरे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, प्रभारी तहसीलदार एच.आर.म्हैत्रे, नायब तहसीलदार सचीन आखाडे,तसेच वैद्यकीय अधिकारी,पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.










