महान्यूज : आजची गझल
घेतला आक्षेप त्यांनी आडनावावर तुझ्या ,
ठेवला विश्वास मग नाहीच कामावर तुझ्या !.
काजव्यांचा गाव आता सोडला आहेस तू ,
चंद्र आहे पण तरी अद्याप मागावर तुझ्या !..
झेपले तितके स्वतःचे दुःख मी सांभाळले ,
टाकला नाही कधी मी भार खांद्यांवर तुझ्या !..
स्पर्श केल्यावर मला गंधाळली होतीस तू ,
गंध माझा आजही असणार बोटांवर तुझ्या !..
चालताना पाहिले नाहीस तू मागे कधी ,
आणि माझी हाकही पडली न कानांवर तुझ्या !.
तू मला कित्येकवेळा तोंडघाशी पाडले ,
राहिलो होतो कितीदा मी भरवश्यावर तुझ्या !..
शांत होण्यासारखी नव्हती तुझी अस्वस्थता ,
शेवटी मग ठेवला मी बुद्ध हातांवर तुझ्या !..
बघ तुला जमलेच तर ओळख मला आतातरी ,
फार वर्षांनी पुन्हा आलोय दारावर तुझ्या !..
हात नव्हते जोडले केव्हा तुझ्या मुर्तीपुढे ,
ठेवले मस्तक कधी नव्हतेच पायांवर तुझ्या !..
शेवटी आले न माझे नाव ओठांवर तुझ्या ,
मी पुन्हा ठेवून चुकलो हात डोळ्यांवर तुझ्या !..
गझलकार- जयेश पवार, मुंबई
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड












खूप सुंदर