बारामती : महान्यूज लाईव्ह
महिन्यांपूर्वीच शेतात नारळाची झाडे तात्या-भाऊंनी लावली…त्या कल्पतरूनेही त्यांना दिर्घायुष्याचा दुवा दिला असेल…पण कोरोनाच्या काळात दोन सख्ख्या भावांना या महामारीने हिरावले, फक्त कुटुंबाचा नाही, तर गावाचाही मोठा आधार या महामारीने काळाच्या पडद्याआड गेला..
तालुक्यातील अंजनगाव येथील दोन सख्खे भाऊ एकापाठोपाठ दोन दिवसांत मृत्यू पावल्याने गावासाठी समंजस व्यक्तींचा आधार गेला. दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात वालचंदनगर मधील दोन सख्खे भाऊ कोरोनाच्या विकाराने गेले…आणि पाठीमागच्या दोन दिवसांत अंजनगावातीलही दोन सख्खे भाऊ काळाच्या पडद्याआड गेल्याने बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातही मोठा धक्का बसला.
प्रतिष्ठित शेतकरी, नामांकित सहकारी संस्थेचे संचालक असलेले ६५ वर्षे वयाचे बंधू अचानकच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अंजनगावातील या शेतकरी कुटुंबास धक्का बसला. त्यापाठोपाठच काही दिवसांतच सर्दी झाल्याचे निमित्त झाले आणि ६३ वर्षाचे दुसरे बंधू देखील दवाखान्यात दाखल झाले. थोरल्या बंधूंना उपचारासाठी बारामतीत दाखल करण्यात आले. धाकट्या बंधूंचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र लक्षणे कोरोनासारखी होती, न्युमोनिया वाढत गेला. उपचारासाठी पुण्यातील दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होते, मात्र प्रकृती बिघडत गेली व एकजण पुण्यात व एकजण बारामतीत उपचार घेता-घेता दोघेही भाऊ एकापाठोपाठ दोन दिवसांत जग सोडून गेले.
अंजनगावसारख्या गावात वडीलांनी प्रतिष्ठेची बनवलेली बागायती शेती या दोन भावांनी वाढवत नेली, फुलवत नेली. बारामतीपासून अंजनगावपर्यंत पाणी आणून पाणीदार शेती बनविण्याची त्यांची संकल्पना शेतकऱ्यांना आवडली, तेथून गावातील शेतकऱ्यांनाही दिशा मिळाली आणि अंजनगावसह आसपासही शेतकऱ्यांनी त्याचे अनुकरण केले. समंजसपणाच्या स्वभावामुळे गावात सुपरिचित असलेल्या या दोन भावांना काळाने एकाच कालावधीत, एकापाठोपाठ नेल्याने कुटुंबावर मोठा आघात झालाच, पण तो गावावरही झाला.










