बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या लढाईत बारामतीतील आरोग्य यंत्रणा जिवाचे रान करीत आहे, याबाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही, मात्र कोरोना तपासणीसाठी स्त्रावाचा नमुना योग्य पध्दतीने न घेतल्याने काल (ता.२७) बारामतीत एक, दोन नव्हे, तब्बल ३२ जणांचे नमुने प्रयोगशाळेने ग्राह्य धरले नाहीत, नमुने मोठ्या संख्येने फेटाळले गेल्याची ही पहिलीच घटना आहे.
कोरोनाचे रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर इतस्ततः कुठेही फिरतात, त्यामुळे कोरोना अधिक फैलावण्याचा धोका आहे या कारणावरून प्रशासनाने बारामतीतील रॅपिड अॅंटिजेन तपासणीत बरेच बदल केले. रुग्ण कोणत्यातरी दवाखान्यात उपचारासाठी दाखल असल्याखेरीज तपासणी करू नये अशा सूचना खासगी प्रयोगशाळांना दिल्या गेल्या आहेत. मात्र शासकीय तपासणीतही त्रुटी आढळल्याने प्रशासनास गांभिर्याने दखल घ्यावी लागली.
बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाची तपासणी करणारी प्रयोगशाळा अद्ययावत आहे. दररोज दीडशेपर्यंत नमुने येथे तपासले जातात. मात्र २७ ऑगस्ट रोजी बारामतीत रुई येथे घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ जणांचे नमुने हे ग्राह्य धरले नाहीत. हे नमुने बारामती शहरासह तालुक्यातील, इंदापूर तालुक्यातील रुग्णांचे होते. हे नमुने योग्य पध्दतीने घेतले नसल्याचा अहवाल शासकीय प्रयोगशाळेच्या यंत्रणेने पाठवला, त्यामुळे स्वाब घेण्याच्या पध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
मागील आठवड्यातही एका दिवशी पाच जणांचे स्वाब व्यवस्थित न घेतल्याचा शेरा प्रयोगशाळेने मारला होता. आता तर थेट ३२ जणांचे स्वाब व्यवस्थित न घेतल्याचा फटका कोरोनाची तपासणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांनाही बसला.
मुळात लक्षणे असतील, त्रास असेल तर त्या रुग्णासाठी तो एक दिवसही महत्वाचा असतो. अशा स्थितीत दोन- दोन दिवस स्वाब द्यावे लागले, तर ते अधिक तणावात राहू शकतात असे मत शासकीय यंत्रणेतीलच आरोग्य अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.
डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी – नव्याने स्वाब घेणाऱ्यांना योग्य पध्दतीने घ्यावयाच्या नमुन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले असून यापुढील काळात अशी परिस्थिती येणार नाही. योग्य पध्दतीने स्वाब घेतल्याने कोरोनाची चाचणीही परिणामकारक होते, हे नव्याने या कामात सहभागी झालेल्यांना समजले आहे. यासंदर्भात योग्य तो समन्वय ठेवण्यात आला असून स्वाबचा नमुना योग्य पध्दतीने घेतले जात आहेत.










