दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस व वरवंड येथे नागरिकांना मागील दोन दिवसात तोंडावर मास्क न वापरणे महागात पडले आहे. यवत व पाटस पोलीसांनी दोन दिवसात सुमारे 67 जणांवर दंडात्मक कारवाई करीत 13 हजार 400 रुपयांचा दंड वसुल केला आहे.
दौंड तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन सातत्याने नागरीकांना काळजी घेण्याचे आव्हान करीत आहे. तोंडाला मास्क वापरावे, स्वच्छता राखावी, सोशल डिस्टिंक्शन पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, मात्र अनेक जण या प्रकाराकडे कानाडोळा करीत विनामास्कचे दुचाकीवर फिरत आहेत. अशा लोकांवर यवत व पाटस पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला.
गुरूवारी (ता.27) पाटस येथे 25 जणांवर मास्कचा वापर न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर आज (ता.28) पाटस व वरवंड येथे 42 जणांनाकडून 8 हजार 400 रूपयांचा दंड वसुल केला आहे. दोन दिवसात एकुण 67 जणांकडून प्रत्येकी दोनशे रूपये प्रमाणे 13 हजार 400 रूपये दंडात्मक वसूली करण्यात आली आहे.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, हवालदार घनश्याम चव्हाण,बाळासाहेब पानसरे, सागर चव्हाण,संतोष मदने, सुधीर काळे, अन्सर शेख, समीर भालेराव आदींनी ही कारवाई केली.
दरम्यान पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे नागरीकांनी स्वागत केले असून यापुढेही ही कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.










