बारामती : महान्यूज लाईव्ह
जेव्हा जेव्हा पवार कुटुंबिय सत्तेत सहभागी असतात, त्या सत्तेचा फायदा बारामतीला नेहमीच होतो…मग पाण्याच्या वाटपाचा प्रश्न असो की, उद्योगाच्या मंजूरीचा…मागील पाच वर्षात भाजपच्या काळात बऱ्हाणपूरच्या पोलिस उपमुख्यालयाचा प्रश्न तसाच रेंगाळला..परिणामी येथे वाढलेले जमीनीचे भावही पुन्हा घसरले..मात्र आज राज्य सरकारने या पोलिस उपमुख्यालय विषयाचे दरवाजे उघडले आणि उपमुख्यालयाचा प्रश्न मार्गी लागला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांच्या सत्काराला उत्तर देताना फक्त कामांवरच आपला भर राहील आणि थोडं थांबा, सगळी कामे मार्गी लागतील असे जे काही आश्वस्त केले होते, त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. बारामतीत आल्यानतर पहाटे पाच वाजल्यापासून विकासकामांच्या पाहणीत रमणारे अजितदादा राज्याचा कारभार हाकताना आपल्या मतदारसंघातील प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत, त्याचाच हा परिपाक आहे.
बऱ्हाणपूर पोलिस उपमुख्यालयाचा अध्यादेश आज महाराष्ट्र शासनाने जारी केला. बारामती तालुक्यात राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक व इतर कारणांमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस उपमुख्यालय निर्माण करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिल्याचे आज गृह विभागाने जाहीर केले.
बऱ्हाणपूर उपमुख्यालयामुळे काय परिणाम होईल
जिल्ह्यातील अर्ध्या भागाचा कायदा व सुव्यवस्थेचा कारभार आता बारामतीतून पाहिला जाईल.
अत्यंत कमी वेळेत विलंबावधी कमी करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कुमक लागलीच पाठवता येऊ शकेल.
जमीनीचे स्थानिक भावही पुन्हा वधारतील. या परिसराला महत्व येऊन येथीलही बाजारपेठेच्या कक्षा रुंदावतील.










