सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर : बारामती राज्य महामार्गावर भवानीनगरचा छत्रपती कारखाना सोडला आणि इंदापूरच्या दिशेने निघालो की, अर्ध्या किलोमीटरवर सणसर गावच्या हद्दीतच रस्त्याच्या कडेला अनेक वाहने, दुचाक्या हमखास थांबलेल्या असतात…येथील गुळाचा चहा अनेकांना भुरळ पाडतो…अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पोरानं हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतल्यानंतर मोठी स्वप्ने पाहिली नाहीत, मात्र पाहिलेल्या स्वप्नानं त्याला एवढं मोठं केलं की, तो मासिक पगार म्हटला तर क्लासवन अधिकाऱ्यालाही मागे टाकतो…
अविनाश रमेश काटकर हे त्या अवलिया युवकाचे नाव.. सध्या इंदापूर व बारामती तालुक्यात ज्या गुळाच्या चहाची सारखी चर्चा होते, तो आर्या गुळाचा चहा या पत्र्याच्या शेडमधील चहा दुकानाचा हा मालक आहे. इंदापूर – बारामती रस्त्यालगत वडीलोपार्जित असलेल्या अर्धा एकर शेतीच्या जीवावर त्याचे वडील रमेश काटकर यांनी तीन वर्षापूर्वी रसवंती सुरू केली. उसाचे कांडे सोलून घेतल्याने येणारा रस अधिक शुध्द व गोडवा असलेला मिळायचा. साहजिकच या रसाकडे लोक आकर्षित होऊ लागले. गेली तीन वर्षे रस्त्यालगतचे हे रसवंतीगृह लोकांच्या पसंतीस उतरले.
या रसवंतीमध्ये वडीलांना मदत करणारा अविनाश हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून परतला. नोकरीसाठी शोधाशोध केली, मात्र नोकरी मिळत नसल्याचे पाहून त्याने वडीलांच्या याच धंद्यात काम करण्याचे ठरवले. मात्र उन्हाळा संपून पावसाळा सुरु झाला की, रसवंतीचे काम थांबायचे. मग बारमाही धंदा सुरू राहीला पाहिजे यासाठी त्यांनी धंद्याचा विचार केला आणि त्यातून चहाचा स्टॉल टाकायची कल्पना पुढे आली. अर्थात चहाचा स्टॉल टाकायचा तर सगळीकडे चहा मिळतोच, फक्त आपलाच चहा पिण्यासाठी लोक कसे येणार ? यासाठी त्याने शोधाशोध सुरू केली आणि त्याला गुळाच्या चहाची आयडीया मिळाली. एरवी गुळाचा चहा म्हटले की, चहा फुटतो..चहा फुटलाही नाही पाहिजे व त्याची चवही दिर्घकाळ जीभेवर रेंगाळली पाहिजे याची जाणीव ठेवून त्याने रेसिपी तयार केली, त्यावर काही काळ काम केले आणि त्यातून आर्या गुळाचा चहा सुरू झाला.
याचा व्हिडीओ पहा.. अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
अविनाश च्या दुकानाला मग हळूहळू लोकांच्या भेटी वाढल्या. अगदी बारामतीतून लोक भेट देऊ लागले. हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली. कोरोनाचा काळ असूनही अजूनही हजार ते १२०० कप दररोज चहाचे जातात. दररोज ९० लिटर दूध त्याला या हॉटेलसाठी लागते. ज्या व्यवसायात काम करायचे, तिथे काहीतरी वेगळे केल्याशिवाय व्यवसायातील यश मिळणार नाही याची त्याची असलेली धारणाच त्याला या व्यवसायात यश देऊन गेली आहे.
गुळाच्या चहाची कल्पना यशस्वी होणार ही माहिती होती, मात्र त्यातून मिळणारे उत्पन्नही महिना दीड ते दोन लाखांवर जाईल याची कल्पना नव्हती. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे ते शक्य झाले आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा असा वेगळा व्यवसाय, ज्यामध्ये नोकरापासून मालकापर्यंत सबकुछ तुम्हीच असाल, तर त्यातून नक्कीच यश मिळू शकते हा धडा मला मिळाला. मी नोकरी केली असती, तर फारतर पंधरा-वीस हजार रुपये पगार मिळाला असता, मात्र आता मी खुश आहे : अविनाश काटकर, सणसर
अविनाशच्या गुळाची चवच वेगळी आहे. या चवीबरोबरच स्वच्छताही राखली जात असल्याने या चहासाठी दूरवरून ग्राहक येत आहेत – सोमनाथ गुप्ते, युवासेना इंदापूर तालुकाप्रमुख.
खरेतर कोणताही व्यवसाय हा मनापासून व स्वतःच्या देखरेखीखाली केला, तर त्यात नक्की यश मिळते, अर्थात यश मिळण्यासाठी तेवढा संयम व चिकाटीही हवी. अविनाशने हे सिध्द करून दाखवले आहे. तो फक्त चहा विकतो, मात्र तेही कार्पोरेट स्टाईलने विकत असल्याने त्याला चांगली पसंती मिळाली आहे, त्यानंतरच्या काळात अनेक ठिकाणी गुळाचा चहा सुरू झाला हे देखील महत्वाचे आहे. – जगदिश कांबळे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी व्यापारी आघाडी.











