दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील दापोडी येथे बेकायदेशीर बिगरपरवाना विक्रीसाठी आणलेला चंदनाचा साठा जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ही कारवाई केली असून चंदन तस्करीची आणखी काही प्रकार समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रामदास शहाजी माने (वय २५ वर्षे रा.मूर्टी, ता.बारामती जि.पुणे), राजू बाबू शिंदे (वय ३०, वर्षे रा.दापोडी वैदवाडी ता.दौंड जि.पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शनिवारी यवत पोलीस स्टेशन हद्दीत जुना केडगाव टोलनाका रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना दापोडी, देशमुख वस्ती, देवई तरकारी सेंटर ता.दौंड जि.पुणे येथे दोघे इसम रमेश करडे यास चंदनाची लाकडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर पथकाने केडगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बापू बंडगर, जितेंद्र पानसरे यांची मदत घेवून त्या ठिकाणी सापळा रचून अचानक छापा टाकला व चंदनाचे लाकडाची विक्री करणेसाठी आलेले दोन आरोपींना मोटरसायकलसह ताब्यात घेतले.
त्यावेळी चंदनाचा माल घेणारा आरोपी रमेश बाबू करडे रा.दापोडी, ता.दौंड जि.पुणे हा हातातील चंदनाचे लाकडाचे पोते तेथेच टाकून पसार झाला. ताब्यात घेतलेले दोघे आरोपी व त्यांचेकडून तेथे मिळून आलेली होंडा शाईन मोटरसायकल नंबर एमएच ४२ एझेड २५१३, रोख रक्कम १८,५००/- , दोन मोबाईल व १,५४,००० / – रुपयाची चंदनाची २२ किलो वजनाची लाकडे असा एकूण दोन लाख वीस हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर दोघे आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल हा यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देवून तिघे आरोपी यांचेविरूध्द भारतीय वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, एलसीबी पथकाने फेब्रुवारी २०१८ मध्ये यातील फरारी आरोपी रमेश करडे यास बोलेरो जीपमध्ये चंदनची तस्करी करताना पाठलाग करून पकडून त्याचेकडून कि.रु. ८,६४,०००/- (आठ लाख चौसष्ठ हजार) चा माल जप्त करून कारवाई केली होती. अधिक तपास केडगाव पोलीस चौकीचे सहा.पोलीस निरीक्षक धनंजय कापरे व पोलीस नाईक बाळासो चोरमले हे करीत आहेत.
प्राथमिक चौकशीत यातील आरोपींनी पुणे, खडकवासला व बारामती परिसरात चंदनाचे झाडांची चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपींचे चंदन तस्करीतील मोठे रॅकेट असल्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तवली आहे. त्यानुसार पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.











