महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
राज्य सरकारच्या कोरोनाविषयक सार्वजनिक आरोग्य विभागाने एक अहवाल जाहीर केला असून या अहवालात आतापर्यंत जो सर्वांचा समज होता की, कोरोना ६० वर्षांवरील लोकांना अधिक होतोय, तो समज मोडीत काढत तब्बल २१ टक्के कोरोनाग्रस्त हे वयाच्या तिशी ते चाळीशीच्या वयोगटातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्यातील ६ लाख रुग्णांपैकी तब्बल सव्वा लाख रुग्ण हे तिशी ते चाळीशीच्या मध्यातील आहेत, सर्वच वयोगटांना कोरोनाची बाधा झाली आहे, मात्र हे प्रमाण सर्वाधिक तिशी व चाळीशीतील लोकांमध्येच अधिक आहे. अर्थात हाच क्रयशक्तीचा सर्वात मोठा गट असल्याने तो सातत्याने बाहेर असल्याने तो अधिक बळी पडणार हे निश्चित आहे. विशीतील युवकांपासून ते तिशीपर्यंतच्या युवकांचा कोरोनाग्रस्त होण्याची टक्केवारी १७ टक्के आहे. या वयोगटातील युवकांपैकी १ लाख १० हजारांवर जणांचा यामध्ये समावेश आहे. अर्थात महाराष्ट्रातील शहरी वा ग्रामीण सर्वच कुटुंबांनी लहान मुलांना मात्र सुरक्षित ठेवले आहे. केवळ ४ टक्के म्हणजे २५ हजारांवरच १० वर्षांपर्यंतची बालके कोरोना संक्रमित झाली आहेत.
देशात आता दर तासाला तीन हजार जणांना कोरोनाची लागण
कोरोनाचा आलेख कमीजास्त होतोय, पण कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत, ते आता एवढ्या प्रमाणात वाढले आहेत की, देशात आता दर तासाला तब्बल तीन हजार कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. मागील महिन्यात हाच आकडा दीड हजारांचा होता. पाच महिन्याचा वेग आता केवळ एका महिन्यावर आला असून हा कोरोनाचा पिक पिरिअड मानला जात आहे. देशात मागील चोवीस तासात कोरोनाचे ७० हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत.










