लक्ष्यवेध : घनश्याम केळकर, बारामती
आफ्रिकन गुलाम ते महाराष्ट्राचा राज्यकर्ता असा थरारक जीवनप्रवास असणारा माणूस म्हणजे मलिक अंबर…!!
या मलिक अंबरचा जन्म आफ्रिकेतील इथिओपियाचा. चापू हे मुळचे नाव. आफ्रिकन काळ्या लोकांना पकडून गुलाम म्हणून जगभर विकण्याची त्या काळात स्पर्धाच सुरु होती. चापूचे घर इतके गरीब की त्याच्या आईवडिलांनीच त्याला वयाच्या आठव्या नवव्या वर्षी मक्केच्या अरब व्यापाऱ्यांना विकले. या व्यापाऱ्यांनी त्याला बगदादच्या एका सरदाराला विकले. या सरदाराने त्याला मलिक अंबर हे नाव दिले आणि मुस्लीम धर्म दिला. तिथेच त्याचे शिक्षण सुरु झाले. काही वर्षात अंबर त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्या सरदाराचा अतिशय आवडता झाला. इतका की त्या सरदाराची मुले त्याचा व्देष करु लागली. यामुळेच या सरदाराच्या मरणानंतर या मुलानी तातडीने मलिक अंबरला विकून टाकले.
त्यांनी त्याला विकले महाराष्ट्रातील अहमदनगर येथील वजीराला. त्यावेळी अहमदनगर हे स्वतंत्र राज्य होते. देशाच्या दक्षिणेकडे ज्या पाच मुस्लिम राजवटी होत्या त्यात अहमदनगर एक होते. येथेही अंबरने वजिराचा विश्वास संपादन केला. जात्याच हुशार असलेल्या अंबरने लष्करी शिक्षण, राजकारण यासह इमारती बांधण्याच्या कामातही प्राविण्य मिळवले. अहमदनगरच्या राजकारणात त्याच्या मालकाचा म्हणजेच वजिराचा खून झाला. त्यानंतर वजिराच्या पत्नी आणि मुलांनी अंबरला गुलामीतून मुक्त केले. त्यावेळी त्याचे वय फक्त पन्नास वर्षे होते.
यानंतरच्या त्या आयुष्यातील 30 वर्षात मलिक अंबर महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूत्रधार म्हणूनच वावरला.
या काळात दिल्लीच्या मुघलांनी अहमदनगरवर पुर्ण ताकदीने हल्ला चढवला. त्या रेट्यामुळे ही राजवट कोसळण्याच्या बेतात आली. त्यावेळी धावून आली चांदबीबी…!
अहमदनगरची मुलगी आणि विजापूरची सून असलेली चांदबीबी आपल्या माहेरच्या रक्षणासाठी अहमदनरला परतली. तिने मुघलांशी जोरदार लढा दिला. त्यावेळेस तिच्या बाजुने लढणाऱ्यात मलिक अंबरही होता. पण दैवाची गती फिरली. चांदबीबीचा तिच्याच सरदारांनी खुन केला. मुघलांचा जोर वाढला, त्यांनी अहमदनगर सह जवळपास सगळ राज्य ताब्यात घेतले. त्यावेळेस मलिक अंबरने ठरवले कि आता जगायच किंवा मरायचे ते अहमदनगरच्या निजामशाहीसाठी. त्याने आपल्यासारख्या आफ्रिकन गुलामांची फौज उभी केली आणि मुघलांशी लढा द्यायला सुरवात केली.
गनिमी काव्याचा वापर करून त्याने मुघलांना हैराण करून सोडले. हळूहळू त्याची ताकद वाढत गेली. त्याच्याजवळ तीस हजाराची फौज जमली. आता त्याच्या जोडीला आले मराठे. लखुजीराव जाधवराव, मालोजीराजे भोसले यांच्यासह अनेक मराठे सरदारांना त्याने मोठा मानमरातब देऊन आपल्याबरोबर घेतले.
निजामशाहीचा कोणी वारस शिल्लक नव्हता, जे होते ते मुघलांच्या कैदेत होते. अंबरने त्यातूनही एक वारस शोधला. त्याला सुरक्षित वाटावे म्हणून त्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्याला त्याने निजामशहा म्हणून घोषित केले आणि मलिक अंबर त्याचा वजीर बनला.
मुघलांकडून जवळजवळ सगळे राज्य त्याने परत मिळवले.यानंतरचे त्याचे कर्तृत्व केवळ लष्करी नाही तर एक राज्यकर्ता, मुसद्दी, एका शहराचा निर्माता म्हणून लक्षात राहण्यासारखे आहे.
औरंगाबाद हे आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर. या शहराचा निर्माता मलिक अंबर. या शहराचे त्यानी ठेवलेले नाव खिडकी. मलिक अंबरने निजामशाहीची राजधानी अहमदनगरहुन खिडकी म्हणजे आजच्या औरंगाबाद येथे नेली. राजधानीच्या या शहरात त्याने अनेक इमारती बांधल्या. या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एक कँनाँल त्याने बांधला. कमी वेळेत आणि कमी खर्चात बांधलेला हा कँनाँल त्या काळातील एक आश्चर्य मानला जायचा.
30 वर्षाच्या मलिक अंबरच्या या राजकीय कारकिर्दीत निजामशाहीची सगळी सूत्रे मलिक अंबरने आपल्या हातात राखण्याचा प्रयत्न केला. त्या काळची निजामशाही म्हणजे विदर्भ वगळता जवळपास सगळा महाराष्ट्राचा परिसर होय.
ही सुत्रे हातात ठेवण्यासाठी त्याने सगळ्या भल्या बुऱ्या मार्गांचा वापर केला. आपला जावई म्हणजेच निजामशहा आपले ऐकेनासा झाला आहे असे ज्यावेळी त्याच्या लक्षात आले त्यावेळी त्याने त्याच्यावर विषप्रयोग करून आपल्या स्वतःच्या मुलीला विधवा बनवले. त्यानंतर आपल्या लहान वयाच्या नातवाला निजामशहा बनवून पुन्हा वजिरपद स्वतः कडे घेतले. कधी विजापूरच्या आदिलशहाची मदत घेऊन मुघलांना रोखले तर कधी मुघलांचा धाक दाखवून आदिलशहाला ताब्यात ठेवले.
मोगल बादशहा जहांगीर अंबरचा भयंकर व्देष करत असे. त्याने एक चित्र बनवून घेतले होते, त्यामध्ये जहांगीर एका काळ्या माणसाचे तलवारीने मुंडके उडवताना दाखवले आहे. हे चित्र जहांगीर सतत आपल्या डोळ्यासमोर दिसेल असे लावले होते. या चित्रातील काळा माणुस म्हणजे मलिक अंबर होता.
पण प्रत्यक्षात जहांगीरची ही इच्छा कधीच पुरी होऊ शकली नाही. जहांगीरच्या कारकिर्दीत मुघलांना कधीही निजामशाहीवर विजय मिळवता आला नाही. असे म्हणतात जहांगीरच्या मरणानंतर त्याचा मुलगा शहाजहान याला बादशाह होण्यासाठी अंबरने मदत केली होती. पण राजकारणाचा पट बदलला आणि शाहजहानाने निजामशाही नष्ट करण्यासाठी मोठे सैन्य पाठवले.
मलिक अंबरच्या शेवटच्या काळात त्याला अनेक पराभव पचवावे लागले. पण सगळ पचवून तो आपल्या राजकीय डावपेच आणि लष्करी ताकदीच्या जोरावर पुन्हा पुन्हा उभा राहिला. त्याच्या मरणापूर्वी काही महिन्यांपूर्वी त्याने मुघलांविरुद्ध मोठा विजय मिळवला होता.
मलिक अंबरचे महाराष्ट्रासाठी एक मोठे योगदान म्हणजे मराठा सरदारांना दिलेले पाठबळ. शिवाजी महाराजांचे दोन्ही आजोबा म्हणजे जिजाबाईंचे वडील लखुजी जाधवराव आणि शहाजीराजांचे वडिल मालोजीराजे भोसले यांसह अनेक मराठा सरदारांना त्याने निजामशाहीत मोठमोठी पदे दिली. हिंदू मुस्लिम असा भेद त्याच्यापाशी नव्हता. शिवाजी महाराजांचे वडिल शहाजीराजे यांची सुरुवातीची सगळी कारकीर्द मलिक अंबरच्या सान्निध्यात घडली. यामुळेच शिवाजी महाराजांच्या मनात मलिक अंबरबाबत अत्यंत आदराची भावना होती.
लोकांना कमीत कमी त्रास होईल अशी करवसुलीची पद्धत अंबरने लागू केली. यातून पडिक जमिन वहिवाटीला आणण्यास प्रोत्साहन मिळाले. हीच पद्धत काही बदल करुन शिवाजी महाराजांनी स्वराज्यात लागू केली.
आफ्रिकन गुलामांच्या कहाण्या अतिशय करुण आहेत. लाखो लोकांना पकडुन जगभरातील बाजारांमध्ये विकले गेले. त्यांच्या पिढ्यानपिढ्या गुलाम म्हणून जगल्या आणि मेल्या. अशा लाखोंपैकी काहीजणांना या गुलामीतून सुटका करून घेण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करून दाखविणाऱ्या काही लोकांमध्ये मलिक अंबरचा समावेश होता. स्थानिक- परदेशी, हिंदु- मुस्लिम, स्थानिक- परप्रांतीय असे अनेक भेद उभे करणाऱ्या या जगात इथियोपियात जन्मलेला एक माणूस गुलाम म्हणून महाराष्ट्रात येतो. या महाराष्ट्राच्या मातीला आपली समजून इथल्या मातीच्या आणि माणसांच्या रक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घालतो. हे पाहिल्यावरतरी आपल्या मनातील असे भेद नाहिसे झाले पाहिजेत.
एक सच्चा महाराष्ट्रीयन असलेला मलिक अंबर 1626 मध्ये मरण पावला. त्यानंतर निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजांनी अपयशी लढा उभा केला. मलिक अंबरच्या मरणानंतर चार वर्षानी याच शहाजीराजांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे दैवत शिवाजीराजे शिवनेरीवर जन्माला आले.
लेखकाला इथे संपर्क साधा- Ghansham Kelkar
email- ghansham.kelkar@gmail.com











