बारामती : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर व्यायाम गृपच्या सदस्यांनी सोमेश्वरनगर ते कडेपठार लिंग खंडोबा येथे २९ किमी डोंगर दरीतुन पायी प्रवास करीत अडीच किमी ची उतरण करीत सुमारे ३१ .५ किमी अंतर चालुन खंडोबाला जगाला कोरोनामुक्तीचे साकडे घातले .
सोमेश्वर येथील राज्य प्राथमिक शिक्षक संघ सरचिटणीस केशव जाधव,आरोग्य सेवा कर्मचारी परवेझ मुलाणी, ॲड गणेश आळंदीकर, मदन काकडे देशमुख, दादासाहेब भंडलकर, संभाजी गायकवाड, रविंद्र पवार यांनी ही पायी वारी करुन खंडोबाला साकडे घातले.
लॉकडाऊनमुळे मंदीर बंद असल्याने वरती मंदीराच्या बाहेरील बाजुने त्यांनी खंडोबाला साकडे घातले. अवघड चढ उतार,डोंगरदरीमार्गे सोमेश्वरहुन निघालेले हे सर्वजण रुपाडी आई चा डोंगर, ब्राम्हणदरा, कर्नलवाडी, राख, बाळाजीचीवाडी, बहिर्जीची वाडी, दौंडज रेल्वेस्टेशन मार्गे दौंडज खिंड व तरसदरा डोंगरातुन अवघड चढण करीत कडेपठार वर सुमारे सहा तास २९ मिनिटे चालुन २९ .७५ किमी चे अंतर पार केले व पुन्हा अडीच किमी परत उतरण असे ३१.५ किमी चे अंतर पार केले .
नियमीत सलग तीन वर्ष या गृपच्या सदस्यांनी दर शनिवारी कडेपठार पायथ्यापासून चालुन वारी केली होती. कोरोनाचे संकट कष्टप्रद असल्याने व रस्त्याने गर्दी होऊ नये या कारणाने डोंगरदऱ्यातुन प्रवास करुन खंडोबाला साकडे घालायचा या तरुणांनी निश्चय केला व तो पुर्ण केला. यांच्यामध्ये शिक्षक व आरोग्यसेवक असल्याने वाटेत दिसणाऱ्या व्यक्तींना कोरोनाबाबतचे गैरसमज याबद्दल ही माहीती त्यांनी दिली. आमच्या अनोख्या वारीची दखल ईश्वरदरबारी घेतली जाईल व कोरोनाचे संकट दुर होइल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.










