महान्यूज : आजची गझल
उन्मत्त श्वापदांनो नाचा खुशाल आता
हा देश भामट्यांना केला बहाल आता
बाजार सज्जनांचा रात्री उठून गेला
निष्पाप पामरांना कोठे विकाल आता
घाई करून थाटा आपापली दुकाने
सोयीनुसार आणा चोरून माल आता
आला पुन्हा नव्याने हंगाम सांत्वनांचा
संभावितांप्रमाणे शोधा रुमाल आता
दे आसरा पुन्हा मी परतून आज आलो
सारे जुने गुन्हे तू पोटात घाला आता
गझलकार- शाहीर सुरेशकुमार वैराळकर
परिचय : शाहीर सुरेशकुमार वैराळकर, पान्हेरा-खेडी, जिल्हा बुलढाणा, सध्या मुक्काम : ए ३/१, सम्राट गार्डन, वैभव टॉकीजच्या मागे, हडपसर, पुणे-२८ संपर्क : ९४२२००३५१२
नवयुवक रसिकरंजन कलापथक या स्वतःच्या पथकाद्वारे शाहिरी कार्यक्रमांचे सादरीकरण (१९६९ ते १९७३)
राष्ट्र सेवादल कलापथक मालेगाव (नाशिक) कलावंत आणि संचालक म्हणून सहभाग (१९७३ ते १९७९)
युवक बिरादरी मालेगाव (नाशिक) द्वारा आयोजित वेगवेगळ्या नाट्यप्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून सहभाग (१९७५ ते १९७९)
युवक बिरादरी मालेगाव (नाशिक) तर्फे आयोजित विविध एकांकिका स्पर्धांचे परीक्षक म्हणून सहभाग (१९७५ ते १९७९) श्री जयदेव हट्टंगडी, श्री यशवंत दत्त आणि श्री अनिल सोनार यांच्यासोबत
महाराष्ट्र शासनाच्या संस्कृती कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्यपातळीवरील तमाशा प्रशिक्षण शिबिरांमध्ये शिबिर संचालक श्री मधुकर नेराळे यांच्यासोबत सहसंचालक आणि प्रशिक्षक म्हणून सहभाग
तमाशा प्रशिक्षण शिबिर सातारा १९८५, तमाशा प्रशिक्षण शिबिर लातूर १९८६, तमाशा प्रशिक्षण शिबिर जुन्नर १९९०, तमाशा प्रशिक्षण शिबिर सांगली १९९१
सहचिटणीस : तमाशा कला कलावंत विकास मंदिर मुंबई (१९७९ ते १९९९)
सरचिटणीस : मराठी लोककलामंच, मुंबई (१९८७ पासून आजतागायत)
मधुकर नेराळे आणि मंडळी मुंबई या नामवंत कलासंचाबरोबर कलावंत आणि व्यवस्थापक या नात्याने महाराष्ट्रात आणि भारतभर तसेच आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमातून मराठी लोककलेचे (गण,गवळण, बतावणी, लावणी) सादरीकरण
गझलसम्राट सुरेश भट यांच्यासोबत त्यांनी स्वतः सादर केलेल्या “रंग माझा वेगळा” आणि “एल्गार” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (१९८० ते २००२… सुमारे ७० कार्यक्रम)
गझलगंधर्व सुधाकर कदम यांच्या निवडक गझल मैफिलींची सूत्रसंचालन
दूरदर्शन सह्याद्री वाहिनी वरील “आमची माती आमची माणसं” या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक आणि मुलाखतकार म्हणून सहभाग
कला अकॅडमी गोवा (गोवा सरकार) सल्लागार मंडळ सदस्यपदी नियुक्ती – २०१५
कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्यावतीने संस्कृती भवन पणजी (गोवा) येथे सप्टेंबर २०१५ आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये आयोजित तीन दिवसीय गझल लेखन कार्यशाळांचे संचालक व मार्गदर्शक म्हणून योगदान
सुरेश भट गझलमंचचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने गझलरंग या तरूण गझलकारांचा सहभाग असलेल्या मराठी गझल मुशायऱ्यांचे राज्यभर नियमित सादरीकरण व सूत्रसंचालन
मराठी रंगभूमी आणि लोककला विशेषतः तमाशा आणि गझल हे विशेष जिव्हाळ्याचे विषय
अंगीकृत उपक्रम : अस्सल मराठी गझल लिहिणाऱ्या नवनवीन गझलकार यांची मुशायरा यांच्या माध्यमातून रसिकांशी भेट घडवून आणणे
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड










