पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
दौंड : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी हद्दीत गळ्याला चाकु लावून भोकसून टाकण्याची धमकी देत दोन मोबाईल, रोख रक्कम ८ हजार ५०० असा एकुण २२ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटल्या प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दौंड तालुक्यातील दोन आरोपींना मुद्दे मालासह अटक केली.
यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी यासंदर्भात दिली. मारुती उर्फ काका नाना वायाळ (वय ३० वर्षे रा.बिरोबाची वाडी ता.दौंड जि.पुणे ) व सागर उर्फ सोन्या जालिंधर ससुर्यवंशी (वय २८ वर्षे रा.केडगाव पिसेवस्ती ता.दौंड जि.पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 जुलै 2020 रात्री 11 वाजण्याचे सुमारास मौजे मदनवाडी ता.इंदापुर गावच्या हद्दीत मदनवाडी चौकात पुलाखाली अनोळखी दोन आरोपींनी विना क्रमांकाच्या हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकलवर येवून रोहन देविदास ढवळे (वय 24 वर्षे रा.टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापुर) व त्याचा मित्र कुणाल नागदेव यांचे गळ्याला चाकु लावून त्यांना भोकसून टाकण्याची धमकी देत दोघांचे खिशातील 2 मोबाईल फोन व रोख रक्कम 8500/- असा एकुण 22,500/- चा माल जबरदस्तीने हिसकावून घेतला व पळून गेले. त्याबाबत रोहन ढवळे यांनी भिगवण पोलील स्टेशनला फिर्याद दिली होती, त्यानुसार भिगवण पोलीलांनी गुन्हा दाखल केला होता.
हे दोघे भिगवण मदनवाडी उड्डाण पुलाखाली चोरीचे मोबाईल विकत असल्याची बातमी मिळाल्याने पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे चोरीचे १७ मोबाईल, गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल, १ चाकू रोख ४००० असा एकूण १,४२,०५०/- चा मुद्देमाल जप्त केला.
सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी याच्यावर यापूर्वी यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी जबरी चोरी गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलील हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पोलीस नाईक सुभाष राऊत, गुरु गायकवाड, प्रमोद नवले आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान अट्टल जबरी चोरांना जेरबंद केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.










