बारामती : महान्यूज लाईव्ह
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अख्या विश्वामध्ये आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. आदिवासी समाजाचा हा गौरव दिन होय. बारामती तालुक्यामध्ये विश्व आदिवासी दिवस अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतिकारक व कुलदेवता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानिमित्ताने आदिवासी समाजाचे स्वतंत्र चळवळीतील योगदान तसेच आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे योगदान व आदिवासी संस्कृती याबद्दल शंकर घोडे यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी समाज हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आदिवासी समाजाला जर प्रगत करावयाचे असेल तर समाजातील नोकरदारांनी गावागावांमध्ये जाऊन समाजाच्या प्रगतीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. मला नोकरी लागली म्हणून मला समाजाचं काही देणे घेणे नाही या अविर्भावात मध्ये नोकरदारांनी न राहता मी एक समाजाचा घटक आहे, समाजाचं देणं लागतो हा दृष्टिकोन मनात बाळगून समाजाविषयी जागरूकता दाखवून समाजासाठी जे जे करणं शक्य आहे ते ते त्यांनी करावे. आदिवासी नोकरदार लोकांनी आदिवासी वस्त्या व गावांमध्ये जाऊन संस्कृती संवर्धन व जतन करण्यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे श्री. घोडे म्हणाले.
आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय बीरसा ब्रिगेड या संघटनांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन व समाजाच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबाविले जातात. अनेक मेळाव्यांच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन केले जाते. आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य या चळवळीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये व सह्याद्रीच्या पट्ट्यात संस्कृती संवर्धन, शैक्षणिक विकास व कला- क्रीडा या व अशा अनेक विषयांवर निस्वार्थी पणाने सध्या काम करत आहे असे श्री. घोडे म्हणाले.
या कार्यक्रमासाठी सोशल डिस्टन्स ठेवून बारामती तालुक्यातील अनेक प्रमुख आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अनेक जाती धर्माचे कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमाला उपस्थित होते.
बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदिवासी दिनदर्शिका व भलर मासिक यांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोकणी यांनी केले तर आभार सुरेश गवारी यांनी मानले.










