बारामती : महान्यूज लाईव्ह
कर्नाटकमधील मनगूत्ती इथे बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा हटवल्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. आज बारामती शहरातील भिगवण चौकात शिवसेनेच्या वतीनेही या प्रकरणी आंदोलन करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी तीव्र घोषणाबाजी करत कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी समन्वयक भीमराव भोसले, तालुकाप्रमुख विश्वास मांढरे, राजेंद्र पिंगळे, निलेश मदने, सतीश काटे, पप्पू माने, सर्वेश वाघ, सुभाष वाघ, निखिल देवकाते, उमेश दुबे, रंगनाथ निकम, अविनाश कदम, आदेश काळे, शौकत बागवान, राजेंद्र गलांडे, सूर्यकांता आगम, तानाजी गायकवाड, विजय हिरवे, गोकुळ रेडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाटक सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत, तसेच कर्नाटक सरकारच्या पुतळ्यास जोडे मारत यावेळी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आहे.. केवळ काही तथाकथित संघटनांनी विरोध केला म्हणून प्रशासनाकडून त्यांची बाजू घेतली जात असेल तर ही खेदजनक बाब असल्याचे सांगून जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे यांनी कर्नाटक सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा अशी मागणी केली. दरम्यान, बारामती शहर पोलिसांकडून या आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.










