अॅक्सिस बॅंकेच्या सहकार्याने झाला बारामतीत उच्च तंत्रज्ञानाचा पहिला प्रयोग
बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून बारामती तालुका व परिसरातील सर्व शासकीय खात्यांतील कर्मचाऱ्यांची कोरोना व इतर साथरोग आरोग्य तपासणीची आगळीवेगळी मोहिम बारामतीत नुकतीच पार पडली.
अॅक्सिस बॅंकेच्या सीएसआर निधीतून हा उपक्रम पार पडला. पुण्यातून कौस्तुभ बुटाला यांच्या सहकार्याने व ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने हा उपक्रम झाला. बारामतीमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द प्रयोगशाळा असलेल्या मंगल लॅबोरेटरीचे प्रमुख डॉ. पंकज गांधी व भवानीनगर येथील डॉक्टर राकेश मेहता यांनी या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी घेतली व बारामती शहर पोलिस ठाण्यापासून या मोहिमेची सुरवात करण्यात आली.
या प्रकल्पाकरीता विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली. या व्हॅनमध्ये डिजिटल एक्स-रे मशीन, ज्या डिजिटल एक्स-रे चे रिपोर्टिंग आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे पुण्यातील निलेश भट्टड व त्यांचे रेडिओलॉजिस्ट सहकारी हे दहा मिनिटात करून देत होते, जेणेकरून जर कोणी कोरोना संशयित सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना तातडीने लगेचच क्वारंटाईन करून ठेवण्यासाठी मदत होत होती. बारामतीतील मंगल लॅबोरेटरीमार्फत लगेचच संबंधित अहवालाचा संदेश व अहवालाची लिंक संबंधित शासकीय कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर उपलब्ध करून दिली जात होती. हाच अहवाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांच्याकडे पाठवला जात होता, जेणेकरून संशतिय असेल तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याची तपासणी अत्यंत जलद गतीने डॉ. मनोज खोमणे यांच्यामार्फत व्हावी. अशा पध्दतीची ही मोहिम होती. बारामती शहर पोलिस ठाण्यातील व तालुका पोलिस ठाण्यातील २०० कर्मचारी, अधिकाऱ्यांची यामध्ये तपासणी करण्यात आली. रुई येथील कोविड केअर सेंटरमधील १०० कर्मचारी, अधिकाऱ्यांची तपासणीही यातून करण्यात आली. यानंतर बारामती नगरपरीषदेच्या २५० कर्मचाऱ्यांची व आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान आढळलेल्या संशयित रुग्णांना लगेच क्वारंटाईन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरला. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या उपक्रमाचे कौतुक झाले.
या मोहिमेचा व्हिडिओ इथे अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.










