बारामती : महान्यूज लाईव्ह
काल बारामतीतील एकूण 64 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, यापैकी 48 नमुने निगेटिव्ह आले असून 16 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, मात्र बारामतीत तपासलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर व पुण्यातून सोमेश्वर नगर येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, त्याची नोंद पुण्यातच होणार असली तरी येथील बऱ्हाणपूरच्या रुग्णामुळे मृतांची संख्या सोळा वर पोहोचली आहे. बर्हाणपुरच्या रुग्णावर गेले काही दिवस उपचार सुरू होते काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बारामती तालुक्यात कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बारामती शहरातील सर्व नागरिकांची कोरोनासह साथरोगासंदर्भातही तपासणी करण्याची मोहीम नगरपरिषद व आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीतील वाढता कोरोना रोखण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.










