महान्यूज: आजची गझल
व्यर्थ शब्दांचाच भारा वाढला
आशयाचा कोंडमारा वाढला
ठेवले होते जिभेला मोकळे
फक्त ओठांवर पहारा वाढला
राहिली नात्यात बस उपयोगिता
शुद्ध प्रेमाचा घसारा वाढला
शिंपडू का प्रेम थोडेसे पुन्हा
आत द्वेषाचा निखारा वाढला
पेटलेले रान आहे भोवती
काळजी घे फार वारा वाढला
ज्या ठिकाणी मी कमी पडलो जरा
नेमका तेथेच मारा वाढला
गझलकार : अमोल शिरसाट
परिचय
नाव – अमोल बी शिरसाट
जन्मदिनांक – ४/४/१९८४
शिक्षण – एम.ए.बी. एड.
व्यवसाय – शिक्षक
पत्ता – द्वारा मिलिंद विद्यालय, कमला नगर, वाशिम रोड, अकोला
संपर्क क्रं – ९०४९०११२३४
साहित्यिक योगदान :
१) २००३ पासून गझल/ कविता लेखन
२) ‘विदर्भाची मराठी गझल- संपादक : डॉ राम पंडित (२००४)’ मध्ये गझला समाविष्ट
३) ‘गझलकार सीमोल्लंघन’ या ऑनलाइन गझल विशेषांकामधे डॉ श्रीकृष्ण राऊत, शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांचे सोबत संपादक म्हणून योगदान
४) ‘समकालीन गझल -१’ या गझल विशेषांकात गझल समाविष्ट
५) विविध वर्तमानपत्र व मासिकांमध्ये गझल/ कविता प्रकाशित
६) अकोला जिल्ह्यात साहित्य संमेलन, कविसंमेलन, गझल मुशायऱ्यांच्या आयोजन व विविध सामाजिक उपक्रमांमधे सक्रीय सहभाग
७) प्रबुद्ध भारत एज्युकेशन सोसायटी, अकोला या अकोल्यातील नामांकित संस्थेत सचिव म्हणून कार्यरत.
८) संपादक : मराठी गझल फेसबुक पेज
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











