इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे काही दिवसापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटना ताजी असतानाच निरगुडे येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही मुले एकाच वेळी मृत्यू पडण्याने मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर दुःखाचं आभाळ कोसळलं.
दीपाली चंद्रकांत मिसाळ (वय 12) व कृष्णा चंद्रभान मिसाळ (वय 8) अशी ही चिमुकली व दुर्दैवी भावंडे असून निरगुडे येथील केकाण वस्ती येथे ही घटना घडली. ही दोन मुले मंगळवारी (ता. ५) पोहण्यासाठी म्हणून बाहेर पडली होती. त्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात, त्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रोखणारे कोणीच नव्हते, शेततळ्याची पाण्याची उंची मोठी असल्याने पोहता न येऊन ही मुले शेततळ्यात बुडाली. त्यांच्या शेजारी राहणारे प्रवीण ब्रह्मदेव केकाण यांनी मुलाच्या आई-वडिलांना कळवून बोलावले व तातडीने मुलांना दवाखान्यात नेले, परंतु तत्पूर्वीच मुलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रेणुका चंद्रभान मिसाळ (वय 27, रा. केकाण वस्ती, निरगुडे, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस ठाण्यातील संदीप कारंडे करीत आहेत.











