बारामती : महान्यूज लाईव्ह
काल दिवसभरात बारामतीसह बारामती तालुक्यात 17 जण कोरोना बाधित आढळल्यानंतर आज पुन्हा तब्बल 12 जण कोरोना बाधित आढळले आहेत, अर्थात यामध्ये बारामती तालुक्यातील 10 जणांचा समावेश असून नगर जिल्ह्यातील कर्जत व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित आढळला आहे.
बारामतीत दररोज कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे, ही वाढ चिंताजनक असून आज पासून बारामतीत रॅपिड टेस्ट होणार आहेत. दररोज वाढत असलेल्या रुग्णांची संख्या व त्याच्या बरोबरीने वाढत असलेली मृतांची संख्या अतिशय चिंतेची बाब निर्माण झाली आहे.
आज आढळलेल्या 10 कोरोना रुग्णांमध्ये बारामतीतील सुहासनगर येथील 25 वर्षीय युवक, जळगाव सुपे येथील 37 वर्षीय महिला, मळद येथील 38 वर्षीय युवक, खंडोबानगर येथील 25 वर्षीय युवक, डोर्लेवाडी येथील 25 वर्षीय युवक, देसाई इस्टेट येथील 40 वर्षीय पुरुष, कुंभारकर वस्ती येथील 22 वर्षीय युवक, बारामती शहर येथील 59 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील पंधरा वर्षीय मुलगी, माळेगाव येथील 43 वर्षीय महिला याखेरीज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील परीटवाडी येथील 60 वर्षीय पुरुष व घाटदरी – सातारा येथील 23 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे.
बारामती व तालुक्यात दररोज वाढत असलेल्या रुग्णांचा विचार करता नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग ठेवणे तसेच गर्दी न करणे हे नियम कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. परंतु सध्या दिसत असलेली गर्दी लक्षात घेता ही गर्दी येणाऱ्या काळात कोरोनाचे रुग्ण आणखी वाढविण्याची भिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बारामती शहर आणि तालुक्यातील ही अनेक गावांमधून संशयित कोरोना ग्रस्तांचे नमुने तपासले जात आहेत, त्याचा विचार करता आपल्या भागात कोरोनाचा रुग्ण नाही असे समजून उगीच नागरिकांनी बाहेर फिरू नये, अनेकजण कोरोनाच्या चाचणीमध्ये निगेटिव्ह येत आहेत याचा अर्थ त्या भागात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही असा होत नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे असे तज्ञांचे मत आहे.










