बारामती : सीएए, एनआरसी आणि इव्हीएम विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला बारामतीतही उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवत या कायद्याला विरोध दर्शवण्यात आला.
सीएए आणि एनआरसी हे कायदे केवळ मुस्लिमांच्या विरोधात नसून एससी, एसटी, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्याक यांच्या विरोधात आहे. भारतीय नागरीकत्व सुधारणा कायद्यासाठी भारताच्या मुळ रहिवासी नागरीकांना ७० वर्षापूर्वीचा रहिवासी हा रहिवासी असल्याचा पुरावा मागितला जात आहे. साक्षर निरक्षर याचा विचार न करता सरसकट रहिवासी दाखले मागितले जात आहेत.
आदीवासी, भटक्या विमुक्त जाती जमाती, बेघर यांच्याकडे दाखले नाहीत. यामुळे केंद्र सरकारने डीएनए च्या आधारावर एनआरसी लागू करावा कारण डीएनएचा पुरावा सर्वांकडे उपलब्ध आहे. केंद्र सरकार हे इव्हीएम मतांची चोरी करून निवडून आलेले सरकार असल्याने ते गैरसंविधानिक कायदे पास करत आहे. त्यामुळे भारतातील निवडणुका या इव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
केंद्राच्या या धोरणांसह खासगीकरणाला विरोध करत हा बंद पाळण्यात आला आहे. बंदमुळे बारामतीतील बाजारपेठा पूर्णत बंद असल्याचे चित्र बुधवारी सकाळी दिसून आले. शहरात चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.










