कन्हेरीतील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या..!
बारामती (महान्यूज लाईव्ह): बारामती एमआयडीसीसह तालुक्यातील काटेवाडी, कन्हेरी परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. आज पहाटे कन्हेरी येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अलगद अडकला आणि शेतकरी, ग्रामस्थानी सुटकेचा निश्वास टाकला.
बारामती एमआयडीसीतील बाउली कंपनीच्या आवारात ९ डिसेंबर २०१९ रोजी रात्री एक बिबट्या आढळला होता.. त्यानंतर काटेवाडी, कन्हेरी परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.. या बिबट्याने या परिसरात अनेक शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या होत्या. तर काही दिवसांपूर्वी एका मेंढ्याच्या कळपावर हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या या बिबट्याचा येथील मेंढपाळांनी पाठलाग केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत संबंधितांना सूचना देत कारवाईचे आदेश दिले होते.
एकूणच बिबट्याच्या वावरामुळे काटेवाडी, कन्हेरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनखात्याने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात बिबट्याचा वावर असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यानुसार रेस्क्यू टीमने या परिसरात पिंजरे लावले होते. आज पहाटे कन्हेरी येथील एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अलगद अडकला. बिबट्या पकडल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी कन्हेरी आणि बारामती येथील वनखात्याच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.
वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनसंरक्षक त्रिंबक जराड, रेस्क्यू टीमचे अभिजित महाले यांच्यासह वनखात्याच्या पथकाने ही कामगिरी केली. या बिबट्याला पकडण्यात आल्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, आज एक बिबट्या जेरबंद झाल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थानी सुटकेचा निश्वास टाकला आहे.











