महान्यूज : आजची गझल
कितीदा पुन्हा तूच हरणार वेड्या
समुद्रास गोडा बनवणार वेड्या ?
असावी फुले फक्त बागेत म्हणुनी,
किती रोज काटे उचलणार वेड्या ?
इथे फक्त अन्याय हा न्याय आहे
कुणाशी कुणाशी झगडणार वेड्या ?
तुला वाटते भ्रष्टता नष्ट व्हावी
कसे पर्वताला हटवणार वेड्या ?
अशक्यास थारा न तव शब्दकोशी
न सत्यात स्वप्ने उतरणार वेड्या
कुणाला हवा गंध रस अन् फुलोरा ?
कुणास्तव उगा तू बहरणार वेड्या ?
नको आळवू कोकिळा, पंचमाला
न गाणे कुणाला समजणार वेड्या
इथे फक्त रेताड नापीक माती
इथे काय मेघा बरसणार वेड्या ?
मुभा एवढी की स्वतःला बदल तू
कसा तू जगाला बदलणार वेड्या ?
गझलकार – संगीता जोशी, पुणे
सौजन्य – गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड










